नवी दिल्ली, 25 मार्च: हिंदू धर्मात गुढी पाडवा, दसरा अर्थात विजयादशमी, बलिप्रतिपदा आणि अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी नव्या कामाची सुरुवात, शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. या प्रत्येक मुहूर्ताचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यात अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) ही तिथी खूपच शुभ मानली गेली आहे.
या दिवशी विवाह, मुंज आणि गृहप्रवेशासारखी शुभकार्यं करायची असतील, तर वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नसते. या दिवशी काही जण घरात विशेष पूजा, जप, होम आदी विधी करतात. अक्षय्य तृतीयेला पितरांना केलेलं पिंडदान विशेष फलदायी असतं, असं पुराणात लिहिलेलं आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया अर्थात आखा तीज असते. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.
शुभकार्यासाठी अक्षय्य तृतीया ही उत्तम मानली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांची जयंतीदेखील असते. अक्षय्य तृतीयेला गंगा स्नानाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी गंगा स्नान केल्यास नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते, असं सांगितलं गेलं आहे. या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते. यालाच अक्षय्य तृतीया व्रत असंही म्हणतात.
याशिवाय अक्षय्य तृतीयेला नवे कपडे, दागिने, घर, वाहन आदी गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र, राजस्थानसह काही राज्यांमध्ये या दिवशी थोडं का होईना पण सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोनं-चांदी खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं.
या दिवशी दान करण्याचंही खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला गहू (wheat), हरभरा (Gram) आणि दुग्धजन्य पदार्थ दान करण्याची परंपरा आहे.
हिंदू धर्मानुसार, या दिवशी आपल्याकडून झालेल्या चुकांची देवाकडे मनापासून माफी मागावी, देव क्षमा करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांकडे क्षमा मागून देवाचा आशीर्वाद मिळवावा, असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले वाईट गुण भगवंताच्या चरणी अर्पण करून त्याच्याकडे सद्गुणांचे वरदान मागावे.
हे वाचा - हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?
या दिवशी नवीन कपडे आणि दागिने खरेदी करणे शुभ असते. अक्षय्य तृतीयेची तिथी पूर्ण शुभ मुहूर्त असल्याने तिचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी लग्न, ग्रहप्रवेश, वास्तू किंवा प्लॉट, वाहन यासारखी शुभ व शुभ कार्ये कोणतीही शुभ मुहूर्त न पाहता खरेदी करता येतात.
हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब
या दिवशी त्रेतायुग सुरू झाले आणि याच दिवशी नरनारायण आणि भगवान परशुराम अवतरले, असा उल्लेख हिंदू पुराणात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडतात. याशिवाय वृंदावनातील श्री बांके बिहारींच्या मूर्तीचे दर्शनही या दिवशी होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshaya Tritiya 2023, Religion