मराठी बातम्या /बातम्या /religion /गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हणतात? असं आहे गुढी उभारण्याचे औचित्य

गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हणतात? असं आहे गुढी उभारण्याचे औचित्य

गुढीपाडवा सणाचे महत्त्व

गुढीपाडवा सणाचे महत्त्व

यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च : हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. देशभरातही ठिकठिकाणी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.

1. गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतात.

2. कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.

3. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा उगाडी म्हणून साजरा केला जातो.

4. काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.

5. मणिपूरमध्ये या दिवसाला सजिबु नोंगमा पानबा किंवा मेइतेई चेइराओबा म्हणतात.

6. चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते.

या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात, म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढी पाडवा म्हणतात. बांबूच्या वर चांदी, तांबे किंवा पितळेचा उलटा कलश ठेवला जातो आणि तो सुंदर साडी किंवा कापडाने सजवला जातो. साधारणपणे हे कापड भगव्या रंगाचे आणि सिल्कचे असते. गुढी, कडुलिंबाची पाने, आंब्याची देठ आणि लाल फुले यांनी सजवली जाते.

घराच्या छतासारख्या उंच जागेवर गुढी ठेवली जाते, जेणेकरून ती दुरूनच दिसते. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजा किंवा खिडक्यांवरही लावतात.

गुढीचे महत्त्व - गुढीपाडव्याशी अनेक गोष्टी निगडित आहेत. त्यातील काही खास पाहुया-

1. सम्राट शालिवाहनने शकांचा पराभव केल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारली होती.

2. छत्रपती शिवरायांच्या विजयाची आठवण म्हणून काही लोक गुढी लावतात.

3. भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असेही मानले जाते. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. याला इंद्रध्वज असेही म्हणतात.

4. 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात.

5. गुढी लावल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते.

6. गुढीला धर्मध्वज असेही म्हणतात; म्हणून त्याच्या प्रत्येक भागाचा स्वतःचा विशिष्ट अर्थ आहे - उलटे भांडे डोके दर्शवते तर दण्ड मेरु-दण्ड मणक्याचे प्रतिरूप मानलं जातं.

7. रब्बी पीक काढणीनंतर दुबार पेरणी केल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात. चांगले पीक येण्यासाठी ते या दिवशी शेतात नांगरणी करतात.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

8. हिंदूंमध्ये संपूर्ण वर्षभरात साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. हे साडेतीन मुहूर्त आहेत - गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी हे अर्धे मुहूर्त मानले जातात.

First published:

Tags: Gudi Padwa 2023, Religion