कोल्हापूर, 31 जानेवारी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी पार पडणाऱ्या प्रमुख सोहळ्यांपैकी एक म्हणजे किरणोत्सव सोहळा आहे. यावेळी सूर्यास्ताची सूर्यकिरणे थेट मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीवर पडत असतात. वर्षातून सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण कालखंडात अशा दोन वेळा हा अद्भुत किरणोत्सवाचा सोहळा पार पडतो.
किरणोत्सवातील विघ्न
किरणोत्सव काळात सूर्यकिरणांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा देखील नेहमीच गाजत असतो. हे अडथळे बाजूला झाले तर सध्या पाच दिवसांचा होणारा हा किरणोत्सव सोहळा सात दिवसांचा आणि तोही पूर्ण क्षमतेने पार पडू शकतो, असा दावा देवस्थान समितीने केला आहे.
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात दोन प्रकारच्या अडथळे येतात एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित अडथळे आहेत. मानव निर्मित अडथळ्यांमध्ये सूर्यकिरणे आणि देवीची मुर्ती यांच्या मार्गात येणाऱ्या इमारती, बाल्कनी, जिना इत्यादींचा समावेश होतो. कित्येक वर्षांपासून हे अडथळे बाजूला करण्याचे प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेले आहेत. या विषयात नागरिकांनी वेळोवेळी समितीला सहकार्य केले आहे. पण तरी देखील सर्व अडथळे बाजूला झालेले नाहीत. त्यामुळे किरणोत्सव नीट होत नाही.
सोलापूरची ओळख असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास माहिती आहे का? Video
किरणोत्सव मार्गातील हे अडथळे बाजूला झाले तर सध्या होणाऱ्या किरणोत्सवापेक्षा वेगळा किरणोत्सव सोहळा आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्या वर्षातील दोन्ही वेळा पाच दिवसांचा किरणोत्सव सोहळा होत असतो. यामध्ये सूर्यास्तावेळी किरणे देवीच्या पायापर्यंत, कमरेपर्यंत आणि चेहऱ्यापर्यंत अशी पाहोचतात. पाचपैकी मधले दोन दिवसच नैसर्गिक अडथळा नसेल तर पूर्ण क्षमतेचा किरणोत्सव पाहायला मिळतो.
... तर मिळेल नवा अनुभव
हा किरणोत्सव सोहळा पाच दिवसांचा नसून तो सात दिवसांचा असतो असं अभ्यासानंतर लक्षात आलं आहे. त्याचबरोबर सूर्यकिरणे वाटेत येणाऱ्या इमारतींमुळे मूर्तीवर टप्प्याटप्प्याने पायापर्यंत, कमरेपर्यंत आणि चेहऱ्यापर्यंत अशी पडतात. हे सर्व अडथळे हटवले तर हा किरणोत्सव सोहळा नक्कीच सातही दिवस पूर्ण क्षमतेचा आपल्याला अनुभवायला मिळेल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.
अंबाबाई मंदिरात किरणोत्सवावेळी सूर्यकिरणांची तीव्रता, हवामान, येणारे नैसर्गिक अडथळे आदी गोष्टींचा अभ्यास गेली कित्येक वर्षे विवेकानंद महाविद्यालयातील खगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर करत आहेत. या अभ्यासातून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या टीमने किरणोत्सवाची वेळ आणि ठिकाण सांगणारे एक मॉडेल तयार केले आहे. त्याचे सादरीकरणही नुकतेच झाले आहे.
750 वर्ष प्राचीन मंदिर, मूर्तींवर हात फिरवला की होतो चमत्कार! Video
हा किरणोत्सव सातही दिवस पूर्ण क्षमतेने होऊ शकत असल्याचे देखील या अभ्यासातून पुढे आले आहे. सध्या पाच दिवस पार पडणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यासाठी देखील नागरिक भक्तीभावाने हजेरी लावत असतात. जर देवस्थान समितीच्या दाव्याप्रमाणे अडथळे बाजूला झाले आणि त्यानंतर हा किरणोत्सव सोहळा सात दिवस पूर्ण क्षमतेने झाला. तर निश्चितच भाविकांमध्ये समाधानाची भावना पाहायला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.