वर्धा, 8 जुलै: महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एकतरी हनुमान मंदिर असतंच. वर्धा जिल्ह्यातील खडकी येथे हनुमानाचं पुरातन मंदिर आहे. वर्धा नागपूर मार्गावरील हे मंदिर अनेक भक्तांचं ऊर्जास्थान आहे. या मंदिराला तब्बल दीडशे वर्षांची परंपरा असल्याचं सांगण्यात येतं. संकटमोचन हनुमानाच्या मूर्तीसह या ठिकाणी मंदिरात असलेलं चिंचेचे झाड देखील 150 वर्ष जूने असल्याचे भक्त सांगतात. या मंदिरातील हनुमानाजवळ केलेली प्रार्थना तो ऐकतो आणि भक्तांची प्रार्थना पूर्ण होते, अशी श्रद्धा असल्यामुळे रोज शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात.. शेकडो भक्त होतात नतमस्तक आपल्यावरील संकट दूर व्हावे, देवांचा आशीर्वाद मिळावा आणि प्रवास सुखरूप व्हावा यासाठी रोज शेकडो भक्त खडकीच्या हनुमान मंदिरात नतमस्तक होतात. या ठिकाणी असलेल्या श्रद्धेनुसार अनेक भक्त या ठिकाणी स्वयंपाक देखील करतात. भक्तांकरिता भक्त निवासाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. त्या ठिकाणी विशेषतः शनिवारी आणि मंगळवारी रोडगे म्हणजेच पानगे शिजवण्याला देखील महत्त्व आहे, असे सचिव श्रीकृष्ण भंडारे यांनी सांगितले.
महिलांनाही घेता येतं दर्शन हनुमानाच्या मंदिरात बहुधा महिला दर्शनला जात नाहीत. मात्र, खडकी येथील हनुमान मंदिरात स्त्री असो वा पुरुष या मंदिरामध्ये सर्वांनाच प्रवेश असतो. या मंदिरासमोरील मार्गावरून प्रवास करणारे सर्व प्रवासी भक्त या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करतात किंवा वाहनातूनही धावता नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाहीत, असं मंदिराचे सचिव श्रीकृष्ण भंडारे यांनी सांगितले. Vinayaka Chaturthi : विनायक आणि संकष्टी चतुर्थीमधील फरक माहिती आहे का? पाहा Video पुरातन मंदिरांपैकी एक खडकी देवस्थान संकटमोचन हनुमानाला रुईची फुलं वाहतात. त्यानुसार रुईच्या फुलांचा हार भक्त हनुमानाला अर्पण करतात. या मंदिराच्या मागे श्री संत गजानन महाराजांचे आणि प्रभू श्रीरामाचे देखील मंदिर आहे. या ठिकाणी नतमस्तक झाल्याने मन समाधान मिळते असे भक्त सांगतात. त्यामुळे वर्धा नागपूर मार्गावरील या खडकी देवस्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असे हे खडकी येथे वसलेले हनुमानाचे देवस्थान सर्व हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते.