मुंबई, 26 ऑक्टोबर : भावा-बहिणीमध्ये स्नेह आणि प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे आज 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी होत आहे. भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहीण एकमेकांना स्नेह अर्पण करतात. ज्यामध्ये भाऊ बहिणीच्या घरी जातात आणि बहिणी भावाला औक्षण-टिळा लावतात. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजेच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. शास्त्रानुसार भावाला टिळा लावताना बहिणीने विशेष मंत्राचा जप करावा. यामुळे प्रेम आणि सदिच्छा वाढतात. आज बुधवारी दुपारी 2.42 पर्यंत कार्तिक शुक्ल प्रतिपदा असली तरी बलिप्रतिपदा दिवसभर साजरी करावी. तसेच द्वितीया दुपारी 2.42 ला सुरू होणार असली तरी दिवसभर भाऊबीज साजरी करावी. पत्नी आणि बहीण कोणीही अगोदर ओवाळले तरी चालेल, अशी माहिती ज्येष्ठ पंचागज्ज्ञ दा.कृ.सोमण फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे. यमद्वितीया/ भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया अपराण्हकाली असेल त्या दिवशी यमद्वितीया / भाऊबीज साजरी करावी. बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.42 वाजता कार्तिक शुक्ल प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होत आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. चौथ्या भागाला अपराण्हकाळ म्हणतात. बुधवार 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.31 ते दुपारी 3.49 अपराण्हकाल आहे. या काळात कार्तिक द्वितीया आहे. त्यामुळे बुधवार 26 आक्टोबरलाच भाऊबीज साजरी करायची आहे, असेही सोमण यांनी सांगितले आहे. भाऊबीजेचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, आपली बहीण यमुना हिच्या विनंतीवरून यमराज कार्तिक शुक्ल द्वितीयेला तिच्या घरी गेले. तेव्हा यमुना आपल्या भावाला पाहून खूप प्रसन्न झाली. त्यांचे स्वागत करून त्यांनी यमराजांना भोजन अर्पण केले, त्यामुळे ते प्रसन्न झाले. निघताना यमाने यमुनेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी येशील. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो, टिळा लावतो, भोजन घेतो, त्याला यमाच्या भयापासून मुक्ती मिळो. त्याला अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही. तेव्हा यमराजाने यमुनेला हे वरदान दिले. त्यामुळे हा भाऊबीजेचा किंवा यम द्वितीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी यमाची पूजा आणि यमुना नदीत स्नान केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
या मंत्राचा जप अवश्य करावा सूर्योद्यापूर्वी स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भाऊबीजेला शुभ मुहूर्तावर पूजा करावी. सर्वप्रथम भावाला पाटावर बसवावे त्यानंतर त्याचे औक्षवान करावे. ज्योतिषशास्त्रात भावाला ओवाळताना मंत्र सांगण्यात आला आहे. ‘गंगा यमुनेची पूजा, यमी यमराजाची पूजा, सुभद्रा कृष्णाची पूजा करा, गंगा-यमुना नीर प्रवाहित करा. हा मंत्र म्हटल्यामुळे भावाचे आयुष्य वाढतं. भावाला गोड खाऊ घाला आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमदेवतेची प्रार्थना करा. हे वाचा - यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा शक्य असल्यास खालील संस्कृत मंत्र म्हणणेही शुभ ‘भ्राअस्तवानुजाताहं भुङ्क्ष्व भक्तमिमं शुभम् । प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत: ॥’