जुन्नर, 15 जुलै: जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे 21 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ओंकार दीपक ढोबळे (वय-21 वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. मुलाच्या निधनाची बातमी समजताच ओंकारच्या आईनं देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ओंकारच्या आईला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिची प्रकृतीची चिंताजनक आहे. आधी मुलगी गेली आता मुलानं आत्महत्या केल्यानं ढोबळे कुटुंबालर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा...जे इतरांना जमलं नाही ते नव्वद वर्षांच्या आजींनी करून दाखवलं, 12 दिवसांत कोरोनाला हरवलं
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असलेल्या माणिकडोह गावात शेती करून आपली उपजीविका भागवणारे दीपक ढोबळे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हतं. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचं आकस्मित निधन झालं होतं. तेव्हा ढोबळे कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मुलीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरलं दीपक ढोबळे आपल्या कुटुंबासह पुन्हा जोमाने शेती कामाला लागले होते. परंतु त्या नंतर आलेल्या कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या शेतमालाचे देखील बाजारपेठे अभावी मोठं नुकसान झालं. त्यानंतर अनेक आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला त्यातच दीपक यांच्या मुलाने मानसिक तणावातून नैराश्य आल्याने शेतातीलच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
तरुण मुलानं आत्महत्या केल्याचं ढोबळे यांना समजल्यानंतर त्यांनी शेतीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांची पत्नी ही एकटीच घरी होती. मुलाच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर त्या माऊलीने देखील पोटची दोन्ही लेकरं गमावल्याच्या दुःखातून शेतात फवारण्यासाठी आणलेलं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून तिची जीवन मृत्यूची झुंज सुरू आहे.
हेही वाचा... कोरोनावर प्रभावी 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, महाराष्ट्राला फायदा
वडील मात्र एकीकडे लेकाचा मृतदेह बाजूला ठेऊन पत्नीच्या उपचारासाठी धावपळ करत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.