पिंपरी चिंचवड, 15 जुलै: कोरोनासारख्या महामारीची लागण झाल्याच कळताच अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील चक्क एका नव्वद वर्षांच्या आजीनं अवध्या 12 दिवसांत कोरोनावर मात केली आहे. या आजीचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे. मुक्ताबाई हिरामण पांचाळ असं या आजीचं नाव आहे. मुक्ताबाईंचा मुलगा माधव पांचाळ यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. व्यवसायात नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मुलाच्या संपर्कात आल्याने आजींनाही कोरोनाची लागण झाली होती. हेही वाचा… उदय सामंत यांची उच्चशिक्षण मंत्रिपदावरुन हकालपट्टी करा, भाजप आमदाराची मागणी मुक्ताबाईना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 12 दिवसांच्या उपचारानंतर आजीनं कोरोनाला हरवलं. नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजीबाई पिंपरीतील म्हेत्रे वस्तीत परतल्या तेव्हा वस्तीतील नागरिकांनी रांगोळी काढून आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत टाळ्याच्या गजरात जोरदार स्वागत केलं. तर घरातील व्यक्तींनी औक्षण करून प्रोत्साहन दिलं. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पिंपरी-चिंचवड येथे कोरोनाबाधितांची संख्या 8 हजारांवर पोहोचली आहे. दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह पिंपरी चिंचवड परिसरात 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे 10 दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी तर 13 ठिकाणी चेकनाके असणार आहेत . हेही वाचा… बापानेच केला अतिप्रसंग, संतापलेल्या मुलीने गळ्यावर पाय देऊन घेतला जीव लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद? पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. दरम्यान, 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाँजदेखील बंद राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.