मुंबई, 02 मार्च : 'टिळक यांच्या घराण्याला तिकीट नाकारलं. वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. ही सर्वजणांना माहिती आहे, जोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला. अकाली दल, ममतादीदी,जयललीता यांचा वापर करून फेकून दिलं तेच टिळक कुटुंबासोबत केलं आहे' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
'पोटनिवडणुकीमध्ये विजय झाल्यामुळे आनंद झाला आहे. लोक आता भाजपच्या तावडीतून बाहेर पडतात, हे बऱ्याच दिवसांनी कसबा मतदारसंघातून आता दिसून आले आहे. आतापर्यंत काही दिवसांपूर्वी शिक्षक पदवीधर महासंघाच्या निवडणुकीचे निकाल हे बोलके होते. आता पोटनिवडणुकीमधून सुद्धा लोकांनी दाखवून दिले आहे. हे मोठे आणि आश्चर्याचे चित्र आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'टिळक यांच्या घराण्याला तिकीट नाकारलं. वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. जोपर्यंत काम होतं तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला. अकाली दल, ममतादीदी,जयललीता यांचा वापर करून फेकून दिलं तेच टिळक कुटुंबासोबत केलं आहे. गिरीश बापट यांच्या उमेदीचा काळ पाहिला आहे. ते एक कार्यकर्ते म्हणून लढत होते. बापट यांच्या प्रचाराचा फोटो पाहिला, मनोहर पर्रिकर यांना सुद्धा असं प्रचाराला आणलं होतं. पण त्यांच्या मुलाला तिकीट नाकारलं. सहानुभूती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे यांना जास्त मतं मिळाली. भाजपच्या विरोधात लोक मत देत आहे, याचा आकडा वाढला आहे. ती मतं एकत्र करणे हे मोठे आवाहन आहे. जर दोन्ही मतांची एकत्र बेरीज केली तर भाजपविरोधात मतदान झाले आहे. मतदार आता जागृत होत चालला आहे. मतांची बेरीज करणे, मतांमध्ये फूट न पडू देणे हे आमचे काम आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
संजय राऊत नेमकं काय बोलले आहे, ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सामनामध्ये सुद्धा त्यांनी छापलं आहे. त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेईल. त्यांच्या विधानावर जर हक्कभंग आणला असेल तर मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रद्रोही कुणाला म्हणाले, त्यांनी चहापाण कुणाबरोबर केला, याबद्दल त्यांनी सांगितलं पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत
बेबंदशाहीला रोखण्याची गरज आहे. जर वेळीच बेबंदशाहीला रोखलं नाही, तर काळ तर सोकावेल, हा देशात हुकुमशाही लागू होईल. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायला आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं.
'निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाने आता समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला आहे. आमच्याबद्दल जो निर्णय दिला तो न्याय मागण्याच्या दृष्टीने चुकीचा आहे. पक्षाचा अधिकार जर निवडून आलेल्या उमेदवारावर असेल तर पक्षात फुट पडली असेल तर आम्ही निवडणूक लढवली किंवा नाही लढवली असा होऊ शकतो. निवडणूक आयोगात आम्ही प्रतिज्ञापत्र दिली. पण तरीही नाकारलं, निवडणुकांपेक्षा निवडणूक आयोग बेकार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, NCP, Pune, Pune Bypoll Election, Shiv sena