संजय राऊतांनीच लक्ष घातल्याने आता पुण्यात शिवसेना टाकणार 'कात'

संजय राऊतांनीच लक्ष घातल्याने आता पुण्यात शिवसेना टाकणार 'कात'

पुणे शिवसेनेचे पालकत्व स्वीकारलेले संजय राऊत आगामी निवडणुकीत 50 नगरसेवकांचे टार्गेट नेमकं कसं गाठणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Share this:

पुणे,22 डिसेंबर: राज्यात ठाकरे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता नाशिकपाठोपाठ पुणे शहर शिवसेनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. संजय राऊत यांनी शनिवारी पुण्यातील शिवसेना नगरसेवकांसह शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले. संजय राऊतांनीच लक्ष घातल्याने पुणे शिवसेनेतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात ठाकरे सरकार येताच इकडे पुण्यातही शिवसेनेच्या शाखा खोलण्याचा एकच धडाका सुरू झाला आहे. पुणे शहरात शिवसेना वाढवण्यासाठी खुद्द संजय राऊतांनीच लक्ष घातले आहे. राऊत यांनी सेना पदाधिकारी आणि पालिकेतील नगरसेवकांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर आगामी महापालिका निवडणुकीत किमान 50 नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ठ ठेवल आहे. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर नवे, जुने शिवसैनिक पुन्हा सक्रीय करण्याचे आदेश शहरप्रमुखांना दिले आहेत.

राऊतांनी 50 नगरसेवकांचं टार्गेट ठेवले असले तरी पुणे महापालिकेतील शिवसेनेची गेल्या चार वर्षांतील कामगिरी फारसी चांगली राहिलेली नाही. 2007 मध्ये शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते.

20 वर्षांतील शिवसेनेच्या कामगिरीचा आलेख

2002- 19

2007- 15

2012- 12

2017- 10 (वर्षे-नगरसेवक)

या आकडेवारीवर नजर टाकली तर पुण्यात शिवसेना नगरसेवकांची संख्या कधीच 20 च्यावर गेलेली नाही. त्यामुळे राऊतांनी दिलेले 50 चे टार्गेट कसे गाठणार, असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, गेल्या विधानसभा भाजपने पुण्यात सेनेला एकही जागा न सोडल्याने शिवसेनेत प्रचंड खदखद होती. त्यातूनच विशाल धनवडेंनी कसब्यातून बंडखोरी केली होती. पण निकालानंतर सगळीच गणितं बदलली आणि सेना सत्तेत तर भाजप विरोधात बसलीय. त्यामुळे सेनेला पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढीसाठी आता सत्तेचं टॉनिकही मिळणार आहे. पण गटबाजीमुळे पुण्यातली शिवसेना अवघ्या 10 नगरसेवकांवर येऊन ठेपलीय. त्यामुळे पुणे शिवसेनेचे पालकत्व स्वीकारलेले संजय राऊत आगामी निवडणुकीत 50 नगरसेवकांचे टार्गेट नेमकं कसं गाठणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published: Dec 22, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading