पुणे, 22 फेब्रुवारी : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा वाद तीन वर्षानंतरही कायम आहे. हा शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी आपण यावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता शरद पवारांनीही पुढचं विधान केलं आहे.
'आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काफी है,' असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती.
बावनकुळेंचा धक्कादायक खुलासा
या सगळ्या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शरद पवारांना भाजप चालतो, पण फडणवीस नको होते. शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते, फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
फडणवीसांचा गुगली
दरम्यान शरद पवारांच्या विधानानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवा गुगली टाकला आहे. 'शरद पवारांनी खुलासा केलेला आहे, चांगलं आहे. राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरून लागली, त्याच्यामागे कोण होतं? याचे उत्तर दिले तर सर्व कड्या जुळतील आणि सगळ्यांच्या समोर सगळं येईल,' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Sharad Pawar