जितेंद्र जाधव, प्रतिनिधी पुणे, 12 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांत भविष्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. पवार हे शेवटी आतून एकच असून ते कसे फुटतील? असा निर्वाळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्गमित्र माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी दिला आहे. काय म्हणाले चंद्रराव तावरे? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय जीवनात सुरवातीपासूनच चंद्रराव तावरे यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली होती. त्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांनी अग्रेसर भुमिका घेऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात कायम भुमिका ठेवून सहकार वाचविण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मागील 25 वर्षांपासून पवार कुटुंबीयांची काडीमोड करून सहकार वाचविण्यासाठी तसेच प्रदूषित होत असलेली निरा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी तावरे यांनी पुढाकार घेतला आहे. वाचा - उद्याच्या बैठकीआधी शरद पवारांनी टाकला मोठा डाव; जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही व्हीप जारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाला. याच संदर्भात आज प्रसिद्धी माध्यमांनी चंद्रराव तावरे यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कोण कुठल्याही पक्षात जाऊ शकतं यात गैर काय आहे. राष्ट्रवादीत फूट वगैरे काही नाही. आत्तापर्यंतच्या राजकारणात पवार कुटुंबीय आतून एकच आहे. राष्ट्रवादी पक्षात काय होईल या संदर्भात विचारले असता, मी काही भविष्यवक्ता नाही. देशात मोदींच्या नेतृत्वात चांगले काम चालले आहे. याला अजित पवार यांनी मदत करावी असा सल्ला तावरे यांनी दिला. भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका संदर्भात ज्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल.त्यावर आत्ताच बोलणे उचित होणार नसल्याचे तावरे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी टाकला मोठा डाव पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या 5 जुलै रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल राज्यप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे,’ असं ट्वीट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीदेखील मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. यापूर्वी सगळ्या आमदारांना शरद पवार यांनी बैठकीला हजर राहण्यासाठी वैयक्तिक फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी पक्षाचे नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्या आमदारांना पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे.