पुणे, 27 जानेवारी : नवीन वाहन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरातील प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) मागील काही महिन्यांपासून स्मार्ट कार्डचा तुटवडा भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांना 'लायसन्स' आणि 'आरसी कार्ड' मिळण्यासाठी 25 ते 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
काय आहे प्रश्न?
'आरटीओ’कडे नवीन लायसन्स काढण्यासह जुन्या लायसन्सवरील विविध सेवांसाठी हजारो नागरिकांकडून अर्ज केला जातात. पुणे शहरात महिन्याला साधारण 21 हजार वाहनांची नोंदणी होते. तर, 25 ते 30 हजार नवीन लायसन्स काढले जातात. पण, यासाठी आवश्यक असलेल्या स्मार्टकार्डचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर लायसन्स आणि आरसी मिळत नाहीत.
लायसन्ससाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये ते मिळणे अपेक्षित आहे. पण, सध्या नागरिकांना 25 ते 30 दिवस झाले तरी आरसी व लायसन्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर, काही जणांचा तर यासाठी अर्ज करुन एक महिना झालाय. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
Pune : थंडीचं वातावरण फुलांनी करा आणखी प्रसन्न, पुष्पप्रदर्शनाचा घ्या फ्रेश अनुभव Photos
राज्यातील आरटीओ कार्यालयांत दिल्या जाणाऱ्या लायसन्स आणि “आरसी’च्या छपाईसाठी एका खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट कार्ड वितरण करण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. पण, या कंपनीकडून गेले काही महिने आरटीओ कार्यालयाला स्मार्ट कार्ड पुरेशा प्रमणात उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे आरटीओ प्रशासनाला नागरिकांना सुविधा देणे अवघड बनलं आहे.
' पुणे आरटीओ’ कार्यालयाने 2021 वर्षात देशात सर्वाधिक लायसन्स वितरीत केले आहेत. लॉकडाउनमध्ये पुणे “आरटीओ’ ची कामगिरी चांगली होती. लवकरच स्मार्ट कार्ड येणार असून नागरिकांना वेळेत लायसन्स देण्याचा प्रयत्न राहील, असं स्पष्टीकरण आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.