अंनिस शेख(प्रतिनिधी),
मावळ, 17 जुलै: येरवडा कारागृहातून गज कापून 5 कैदी पसार झाल्याची घटना ताजी असतानाच वडगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमधील धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना भेटण्यासाठी वडगाव ग्रामीण पोलीस कोठडीच्या बाहेर लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर चढून नातेवाईक बिनधास्तपणे आरोपीची भेट घेत आहेत. विशेष म्हणजे पोलिस कोठडीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसमोर हा सगळा प्रकार सुरु आहे. त्यामुळे कुंपनच शेत खात असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा...प्रेमासाठी काय पण! प्रेयसीला भेटायला चक्क दुचाकीनं पाकिस्तानला निघाला तरुण, पण..
धोकादायक पद्धतीने होणारी ही भेट नातेवाईकांच्या जीवावर बेतू शकते. अग्निशमन विरोधकांसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पाईपवर चढून पोलिसांदेखत हा सावळा गोंधळ सुरु आहे. नागरीकांना नियमांचे धडे शिकवणाऱ्या पोलिसांसमोरच नियम पायदळी तुडवले जात आहेत.
गज कापून येरवडा कारागृहातून 5 कैदी फरार
कोरोना आणि लॉकडाऊन असताना पुण्यातील येरवडा कारागृहातून 5 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. कैदी गज कापून पळून गेल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या कैद्यांची नाव आहेत.
या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडे गज कापण्यासाठी धारदार शस्र कुठून आलं आणि त्यांना कोणी मदत केली का यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा...मुंबईत रहिवाशी इमारत कोसळली, मृतांची संख्या 9, ढिगाराखाली सापडली गरोदर महिला
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जात पडताळणी कार्यालयाच्या परिसरातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारतीमधील खोलीचे गज तोडून हे 5 कैदी फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.