(प्रशांत लीला रामदास/ बालाजी निरफळ)
नवी दिल्ली/उस्मानाबाद, 17 जुलै: देशात कोरोनाचा कहर असताना प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असणारा एक 'आशिक' समोर आला आहे. हा आशिक उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथील असून तो चक्क दुचाकीवरून पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. मात्र, भारत-पाक सीमेवरुन या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा...सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, CBI ची गरज नाही
सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन ताब्यात घेतल्या तरुणाचं नाव झिशान सिद्धिकी (वय- 20) असं आहे. झिशान याला बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं. जवानांनी त्याची चौकशी केली असता पाकिस्तानात प्रेयसीला भेटायला निघाला असल्याची माहिती झिशान यानं दिली आहे. दरम्यान, देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. मात्र, झिशान हा उस्मानाबाद येथून दुचाकीने थेट भारत-पाक सीमेवर कसा पोहोचला, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रेयसीसाठी झिशाननं असा केला प्रवास....
झिशान हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका तरुणीशी त्याचं प्रेम जुळलं. एवढंच नाही तर त्यानं प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची तयारी केली. उस्मानाबादहून तो अहमदनगरपर्यंत चक्क सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरातमधील आंतराष्ट्रीय सीमेपर्यत दुचाकीनं प्रवास केला. मात्र, सीमेच्या जवळील वाळूत त्याची दुचाकी अडकल्यामुळे तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. मात्र, सुरक्षा जवानांनी सीमेवर वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडली. नंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली असता पाकिस्तान आणि कच्छ सीमेवर फिरत असलेल्या झिशान याला ताब्यात घेतलं. झिशान यानं सांगितलेल्या माहितीत किती तथ्य आहे, याचा लष्कराचे अधिकारी शोध घेत आहेत.
हेही वाचा...मुंबईत रहिवाशी इमारत कोसळली, मृतांची संख्या 9, ढिगाराखाली सापडली गरोदर महिला
दुसरीकडे, उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशान याला घेण्यासाठी रवाना झालं आहे. झिशान याचे वडील मौलाना आहेत. उस्मानाबाद पोलिसांसह औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने झिशानच्या घराची झाडाझडती घेतली. त्याचा लॅपटॉप तपासण्यात आला. झिशान पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात आहे, अशी माहिती समोर आली आहे.