चिंचवड, 03 मार्च : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत. पण, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मात्र आपलं डिपॉझिट गमवावं लागलंय.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीची एकूण आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या एकूण 28 पैकी 26 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अनेकांच्या मते विजयाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटेचा देखील डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे.राहुल कलाटेंना यावेळी केवळ 44 हजार 82 मतं पडली. मात्र ही मते अनामत रक्कम वाचवू शकली नाही.
('तुमच्यासारखं आत्मक्लेश करायला गेलो नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा अजितदादांना टोला)
चिंचवड मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी पोटनिवडणुकीत 2 लाख 87 हजार 145 जणांनी मतदान केलं होतं, या झालेल्या मतदानापैकी एकषष्टांश म्हणजे, 16 पुर्णांक 6 टक्के मतदान म्हणजेच सुमारे 47 हजार 666 एवढं मतदान ज्या उमेदवाराला मिळालं त्यांचीच अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट परत दिली जाणार होती.
(अजितदादांनी प्रतिष्ठेची केली, तरी चिंचवडची जागा महाविकासआघाडीने का गमावली? 8 कारणांनी फिरलं चित्र!)
मात्र विजयी उमेदवार अश्विनी जगताप आणि केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे वगळता कलाटेंसह अन्य 26 जणांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी भरलेली अनामत रक्कम म्हणजेच डिपॉजिट जप्त झाली आहे.
राष्ट्रवादी इथे उमेदवार का दिला -
दरम्यान, अजित पवारांनी चिंचवडमध्ये नाना काटेंना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात इथे आपला उमेदवार दिला. मात्र, दुसरीकडे राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याठिकाणी शिवसेना उमेदवाराला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, चिंचवड परिसरात राष्ट्रवादीचे चांगले वर्चस्व आहे असे मानले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इथे राष्ट्रवादीने उमेदवार दिला. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला मिळाली म्हणून शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संपर्क करत माघार घेण्याबाबत चर्चा केली. मात्र, तरी त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि ही निवडणूक लढवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.