पुणे, 4 जानेवारी : सेल्फी घेताना अनेकांचा तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना याआधी समोर आलेल्या आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माकडांना खायला देत असताना सेल्फी काढणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. सेल्फी काढताना शिक्षक थेट 600 फूट खोल दरीत पडला. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात ही घटना घडली.
अब्दुल शेख असे या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या शिक्षकाचा मृत्यू झाला असून नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता शिक्षकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या शिक्षकाने घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावली होती. यानंतर माकडांना खायला देत सेल्फी घेत असताना संध्याकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अब्दुल कुदबुद्दीन शेख (रा.एरंडी कोरंगळा जि. लातूर) सध्या त्यांच्या कुटुंबासह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते (मंडणगड जि. रत्नागिरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला होते. तर त्यांची पत्नी (करंजावणे ता. वेल्हा) येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. पुण्याहून भोरमार्गे महाडला ते जात होते. यावेळी वरंध घाटात माकडांना खायला घालताना सेल्फी घेत असताना या शिक्षकाचा तोल जाऊन तो खोल दरीत पडला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली. तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
हेही वाचा - ..म्हणे अंगात दैवी शक्ती, महिलेसोबत वारंवार ठेवले शरीर संबंध; नाशिकमधील घटनेने खळबळ
महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात आले. भोरहून वरंध घाटमार्गे मंडणगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला असावा, असा अंदाज स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची MH 03 BE 7415 या क्रमाकांची लाल रंगाची कार आढळली. त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Pune, Selfie photo, Teacher