पुणे, 01 मे: मृत्यूनंतर व्यक्तीचा अंत्यविधी करण्यास नातेवाईक पोहचू शकले नाहीत त्यावेळी खाकी वर्दीनं पुढाकार घेतला. एका पोलिसाने या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका परप्रांतीय इसमाचा मृत्यू झाला होता. पोलीस स्टेशन मध्ये हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या इसमाचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवून दिला. शवविच्छेदन झाले मात्र मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास कुणीच समोर येईना. घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना येथील पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी मात्र कर्तव्य पार पाडत सदर इसमाच्या मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला आणि खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापुरात घडले आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुधवारी एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार दत्तात्रय बनकर आणि मदतनीस पोलीस शिपाई अंबादास थोरे होते. अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे पाठवून देत मयत इसमाच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांना याबाबत माहिती दिली. मात्र मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर झाले नाही.
(हे वाचा-अभिनेता कोरोना रुग्णांसाठी झाला ड्रायव्हर; अॅम्ब्युलन्स चालवुन करतोय मदत)
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैजनाथ काशीद यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून दिले, पण नातेवाईकांनी तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी उपस्थिती दर्शवली नाही. यावेळी पोलीस शिपाई अंबादास थोरे यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे त्यांनी मृताच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यांनी असे कळवले की, 'साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात आहोत, सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यात तिकडे येण्याच्या मोठ्या अडचणी आहेत. तुम्हीच आमचा मुलगा आहात या हेतूने तिकडे अंत्यविधी करा आम्हाला व्हिडीओ कॉल करून आमच्या माणसाचे अंतिम दर्शन द्या', अशी विनंती केली. यावेळी अंबादास थोरे यांनी देखील क्षणाचा विचार न करता याला होकार देत सदर मयत इसमाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
(हे वाचा-मामाला भेटायला गेलेली आई परतलीच नाही, बाबाही रुग्णालयात; 8 वर्षाच्या मुलाची...)
यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर इसमाचे शिक्रापूर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले, यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, बबलू शेख, पप्पू चव्हाण, सिकंदर शेख यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले मात्र पोलीस शिपायाकडून घडलेल्या अनोख्या प्रकारातून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.