पुणे, 05 नोव्हेंबर : पुण्यातील (Pune) नवले पुलाजवळ ( Navle bridge) आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. वडगाव परिसरात ब्रेक फेल झाल्याने एका भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही. या अपघातात एक जण जखमी झाला असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर आज गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास वडगाव परिसरात हा अपघात घडला. तांदळाची पोती घेऊन कर्नाटककडून मुंबईकडे जात असलेल्या माल ट्रक ( क्रमांक KA 17 D 0321) वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोर पोहोचला होता, त्यावेळी अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि समोर येईल त्या वाहनांना ट्रकने धडक दिली. या ट्रकचा वेग इतका होता की, त्याने रस्त्यातील चार ते पाच गाड्यांना बाजूला फेकले. पण, पुढे जाऊन एक दुचाकी ट्रकच्या खाली सापडली गेली. त्यामुळे ट्रकचा वेग हा कमी झाला आणि काही वेळाने तो जागेवरच थांबला.
या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली.
नवीन कात्रज बोगदा ते वडगांव पुल दरम्यान तीव्र उतार असल्याने माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक लागणे अशक्य होते. अशावेळी वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे. पण हायवे अथॉरिटीकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.
2 नोव्हेंबर रोजी सुद्धा नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने पाच ते सहा चारचाकी आणि दुचाकी वाहनांना धडक दिली होती. या अपघातात काही जण जखमी झाले होते. भरधाव ट्रक समोर येईल त्या वाहनांना चिरडत पुढे जात होता. यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना होती. आणि आज पुन्हा एकदा नवले पुलाजवळ असाच अपघात घडला आहे.