पुणे, 02 मार्च : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या निकाल जाहीर झाला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवाराच्या विजयासाठी खुद्द एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतल्या होत्या. पण पुणेकरांनी नॉट ओके म्हणत भाजपला पराभूत केलं आहे.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे, भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता. पण, पुणेकरांनी भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडमध्ये जातीने दखल देऊन प्रचार केला होता. कसब्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारसभा आणि रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाले होते. एवढंच नाहीतर शिंदे गटाचे मंत्री सुद्धा प्रचाराला लागले होते. पण, शिंदे गटाला पुणेकरांनी सपशेल नाकारले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरीचा शिंदे गटाला फटका बसला.
मनसेचा भाजपला पाठिंबा वाया
मनसेनं या निवडणुकीमध्ये उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी एखाद्या आमदाराचं निधन होतं, अशा ठिकाणी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. एवढंच नाहीतर अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी पत्र सुद्धा लिहिले होते. पण, महाविकास आघाडीने उमेदवार उतरवल्यानंतर मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यात मनसेची ताकद तशी चांगलीच होती. पण, राज ठाकरेंच्या बदलत्या निर्णयाचा मनसेला फटका बसला. मनसेचे सैनिक सुद्धा भाजपल्या मदतीला धावून आले होते पण त्यांची मेहनत वाया गेली आहे.
भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका
पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे. एवढंच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस भाजपच्या पथ्यावर पडली आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, NCP, Pune, Pune Bypoll Election, Shiv sena