पुणे, 10 मे: मुंबईपाठोपाठ पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात पसरत आहे. त्यात उद्योग-धंदे ठप्प झाल्याने हातवर पोट असलेल्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्यानं राज्यातील परप्रांतीय मजुरांनी आपापल्या प्रांतात पायी जाणं पसंत केलं आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस आहे. अशा स्थलांतरित मजुरांसाठी पुणे जिल्हा प्रशासानाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांवर स्थलांतरित मजुरांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मजुरांसाठी नाष्टा, जेवण आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हेही वाचा.. जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या विश्रामगृहात मजुरांना मजुरांना हात धुण्याची सोय, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं. सोशल डिस्टन्स पालन होईल, याची दक्षता घ्यावी. विश्रामगृहाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त गरजेनुसार तैनात करावा, अशा सुचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या परवानगीनंतर ग्रामपंचायतनं विश्रांतीगृह त्वरित सुरू करावे, विश्रांती ग्रहात चहा, नाश्ता, भोजन आणि स्वच्छतागृह व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे-बंगळुरु, पुणे-सोलापूर, पुणे-नगर ,पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक या महामार्गांवर मजुरांसाठी चहा, नाश्ता, भोजन आणि स्वच्छतागृहाची सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हेही वाचा.. राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, भावजयीच्या नावावरील बियर बारला ठोकलं सील! दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर 10 ते 17 मेपर्यंत कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्त्वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्यांच्या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग या सर्वांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.