पुणे, 26 मार्च: पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार की नाही (Coronavirus Lockdown in Pune) याबाबत 2 एप्रिलला आणखी एक बैठक घेतली जाईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. 'लॉकडाऊन करण्याची अजिबात इच्छा नाही मात्र दुसरी लाट थांबवायची तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असं मंत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे', असंही अजित पवार म्हणाले. पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊन लागू करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुणेकरांसाठी कोरोना विषाणू ही एक अत्यंत चिंतेची बाब बनत चालली आहे.
अजित पवार यांनी असे म्हटले की, 'लॉकडाऊन लावायची इच्छा नाही. त्यामुळं गरिबांची रोजी रोटी जाते. मात्र राज्यात कोरोना प्रादुर्भावाची स्थिती गंभीर आहे.आकडे वाढत चालले आहेत, अशा स्थितीत कठोर उपाय योजना राबवण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळं परत लॉकडाऊन करावा असं तज्ज्ञ म्हणत आहेत.'
1 तारखेनंतर सर्व प्रकारचे खाजगी कार्यक्रम बंद करावे लागतील. हॉटेलमध्ये फक्त पार्सल सुविधा ठेवावी लागेल या दृष्टीने विचार सुरू आहे असं पवार म्हणाले. होळी, रंग पंचमीवर बंदी घातलीच आहे.10 वी आणि 12 वीच्या परीक्षा तसेच mpsc चे उर्वरित 2 पेपर्स ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील अशीही माहिती पवारांनी दिली.
(हे वाचा-कोरोनाची दुसरी लाट! देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ, राज्यातील परिस्थिती चिंताजनक)
अजित पवार पुढे म्हणाले की, 'खाजगी दवाखान्यातील 50 टक्के बेड्स प्रशासन ताब्यात घेईल. पिंपरी चिंचवड मध्येही नव्याने कोविड सेंटर्स सुरू केले जातील. पश्चिम बंगाल आणि काही राज्यात निवडणुका आहेत तिथं सभा, प्रचारात प्रचंड गर्दी होतेय. या राज्यात कोरोना वाढत नाही मात्र महाराष्ट्रात वाढतोय याचं कारण काय हे केंद्रीय पथकाला विचारलं आहे. तसेच लसीकरण वेगाने व्हावे यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट म्हणजे 300 वरून 600 करत आहोत. मात्र लशीचे डोस कमी पडू देऊ नका अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे.'
(हे वाचा-पुण्यात कोरोनाचा कहर! ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली 50 हजारांवर)
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरचं थैमान (Coronavirus peak in maharashtra) महाराष्ट्राने अनुभवलं होतं. दररोज हादरवणारे आकडे आणि मृत्यूंचं थैमान महाराष्ट्र पाहात होता. त्यानंतर हळूहळी दररोज नव्याने सापडणाऱ्या कोरोनारुग्णांचा आकडा (Covid-19 Maharashtra) कमी कमी होत गेला. कोरोनावर मात केल्याच्या बातम्याही झाल्या आणि आता मात्र फेब्रुवारीपासून कोरोनारुग्णांच्या आकड्यांचा आलेख पुन्हा झराझर वर चढतो आहे.
पुण्यात (Pune corona updates) महापालिकेने अलीकडेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. रात्री 11 ते सकाळी 6 संचारबंदी लागू करण्यात आली होती. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्याची सूचना या निर्बंधांमध्ये देण्यात आली होती. मात्र आता कडक लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Pune