पिंपरी चिंचवड, 21 जुलै: पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरात असलेल्या एका एटीएम सेंटरमध्ये अचानक स्फोट (explosion in ATM Center) झाल्याची माहिती समोर आली आहे. एटीएम सेंटरमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरातील एटीएम सेंटरमध्ये अशाच प्रकारे एक स्फोट झाला होता ज्याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका एटीएम सेंटरमध्ये अचानक स्फोट झाला होता. या एटीएम सेंटर बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फूटेज (CCTV footage) समोर आले असून त्यात संशयित दिसत आहे. रांजणगाव एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीतील एटीएम सेंटरमध्ये झालेला स्फोट पाहता हे कृत्य चोरीच्या उद्देशाने केलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन्ही घटनेतील आरोपींची गुन्हेगारी पद्धत एक सारखीच असल्याचं दिसत आहे.
रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एटीएम सेंटर बाहेरील सीसीटीव्हीत फूटेज, संशयित सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/hzrqD9nk3e
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2021
आज चाकण एमआयडीसीतील एटीएममध्ये स्फोट
चाकण MIDC परिसरातील आंबेठान गावाजवळील भांबोली फाट्यावर असलेल्या हिताची बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा स्फोट नेमका कसला आहे आणि कशामुळे झाला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, ATM सेंटरचे दरवाजे दूर फेकले गेले आणि ATM मशीन ही जळाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या विचित्र घटनेनं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे. दरम्यान हा स्फोट चोरीच्या उद्देशाने केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Crime, Maharashtra, Mumbai, Pune