पुणे, 01 जून : जुन्नर (Junnar) परिसरात टोमॅटो पिकात 5 ते 6 प्रकारचे व्हायरस (Virus on Tomato) आढळले आहेत. सध्या जुन्नरमध्ये त्याची मोठी चर्चा सुरू आहे. टोमॅटो पिकांचं हब आणि निर्यातीत अग्रेसर असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरात टोमॅटो उत्पादक यामुळं संकटात सापडलाय. या 'प्लास्टिक टोमॅटो' मुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या तोट्याचा सामना करावा लागत आहे. (Tomato Farmer loss due to virus)
(वाचा-पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून हाय अलर्ट)
जुन्नर तालुक्यातील येडगावच्या सुभाष गावडे यांनी 2 एकरवर टोमॅटो लागवड केली. एकरी अडीच लाखांचा खर्च झाला. पण टोमॅटो तोडणीआधी संपूर्ण पिकावरं विविध व्हायरसमुळं आजारांचा हल्ला झाला. त्यामुळं फळं लाल होण्याऐवजी जागेवरच पिवळे आणि खराब होऊ लागले आहेत. फळाला आतून गर नसल्याने वजनही नाही. वजन नसल्याने शेतकरी या आजाराला 'प्लॅस्टिक टोमॅटो' म्हणत आहेत. वर पिवळा रंग, आत काळी पांढरी बुरशी यामुळं शेतकरी संकटात सापडलाय.
एकट्या जुन्नर तालुक्यात यंदा सुमारे 3 हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड आहे. 15 दिवसांपासून शेतकऱ्यांनी रोगाच्या लक्षणाच्या कृषी विभागाकडं तक्रारी केल्या. उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी बागांची पाहणी केली. त्यात 50 टक्के बागांवर या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही टोमॅटोमध्ये प्रथमच पाच ते सहा प्रकारचे विषाणू जुन्नर परिसरात आढळल्याचे News 18 लोकमत शी बोलताना सांगितलं.
(वाचा-कोरोनानं पती हिरावला; संकटकाळात मैत्रिणींनी दिला आधार, केली लाख मोलाची मदत)
कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, कृषी विस्तार विशेषज्ञ राहुल घाडगे यांनीही अनेक ठिकाणी पाहणी केली. त्यांनाही अनेक बाबी आढळल्या आहेत. बियाणे, माती, वातावरण, औषधी यामुळं किंवा इतर काही कारणानं हे विषाणू टोमॅटोवर आले याचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण भागात कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
नाशिक, सातारा, अहमदनगर आणि पुणे येथे उन्हाळी किंवा रब्बी टोमॅटो फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात संरक्षित सिंचन स्त्रोतांवर घेतला जातो. जुलैनंतर बाजारपेठेत येतो. पण यंदा लवकर पिकणे, पिवळ्या रंगाचे आणि फळांमध्ये विकृती आढळून येत असून नुकसान होत आहे. व्हायरसच्या विविध चाचण्या करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.