पुणे, 01 जून: कोरोनामुळे पतीचं निधन (Husband died due to corona infection) झाल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या तरुणीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मैत्रिणीला संकटकाळात पाहून मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आर्थिक आणि मानसिक आधार दिला आहे. तिच्या मित्र मैत्रिणींनी शक्य होईल इतका मदतनिधी संकलित करून मदत केली आहे. अवघड काळात धावून आल्यामुळे खऱ्या मैत्रिचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.
पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असणाऱ्या अलका जगताप स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. दोन वेळा त्यांनी मुलाखतीचा टप्पा देखील गाठला आहे. अजूनही त्यांनी हार मानली नसून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अलका यांचा पती प्रमोद यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसंच त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे बचत केलेले पैसेही संपले आणि पतीचंही निधन झालं. त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या अलका जगताप यांना तिच्या मित्र मैत्रिणींनी मोलाची मदत केली आहे.
पतीच्या निधनामुळे अलका आर्थिक संकटात सापडल्याचं कळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अन्य मैत्रिणींनी पुढाकार घेऊन मदतनिधी उभा करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार अन्य मित्र मैत्रिणींनी आपापल्या परीने जेवढं शक्य असेल तेवढी मदत केली. त्यांनी एकूण 67 हजार रुपयांचा निधी उभारला. 67 हजार रुपयांची ही रक्कम मित्रांनी अलका यांना दिली आहे. मित्रांच्या या मदतीमुळे पुढील काही दिवस तरी अलका यांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनी मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अलका यांनाही गहिवरून आलं होतं.
हे वाचा-शंभरी पार आजीआजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला
यावेळी अलका यांनी सांगितलं की, लोकांकडून पैसे उसने घेऊन पतीच्या उपचाराचा खर्च भागवला. अशात कोणतीही मदत न मागता मित्र मैत्रिणींनी स्वतः हून निधी जमवून दिला आहे. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, या जाणिवेनं आधार वाटला, अशी भावना अलका यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Pune news