पुणे, 26 फेब्रुवारी : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. पण पुणेकर मतदारांचा थंड प्रतिसाद पाहण्यास मिळत आहे. दोन्ही मतदारसंघात मतदानाला अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे कसबा पोटनिवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का एरवीपेक्षा घसरल्याचं बघायला मिळतं आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 18.50 टक्क्यांपर्यंतच नोंदली गेली आहे. तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात तर अवघ्या 3 टक्क्यांची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनी आवाहन करून देखील चिंचवडमधील मतदानाचा टक्का वाढताना दिसत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
चिंचवडमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीमधील तीनही उमेदवार एकमेकांचे नात्यागोत्यातले आहेत आणि त्यामुळे अनेक मतदारांची गोची झाली आहे. शिवाय राज्यातल्या राजकारणात घडलेल्या घडामोडीमुळे मतदारांचा राजकरणावरून विश्वास उडाला असल्याने देखील मतदार बाहेर पडत नसल्याचं अभ्यासकांचे मत आहे. मात्र असं जरी असलं तरी मतदान करणं आपला नैतिक अधिकार असल्याचं सांगत नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावा, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी केलं आहे.
(राज ठाकरेंना पत्र लिहीत मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण)
विशेष म्हणजे, पुण्यात यंदाची निवडणूक ही रंजक ठरली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. एकूण 16 उमेदवार रिंगणात आहे. कसब्यात एकूण २ लाख ७५ हजार ४२८ मतदार आहे. यात १ लाख ३८ हजार ५५० महिला तर १ लाख ३६ हजार ८७३ मतदार आहे. तर फक्त ५ तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण मतदार केंद्र ७६ मतदान केंद्र आहे. यात ९ मतदार केंद्र संवेदनशील आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाटी १३०० पोलीस कर्मचारी तैनात आहे.
(Chinchwad by-election : वडिलांच्या आठवणीने जगतापांची लेक झाली भावुक, डोळ्यात आलं पाणी)
तर चिंचवड निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष मिळून एकूण २८ उमेदवारांचं मत मतपेटीत बंद होणार आहे. तर या मतदारसंघात 5 लाख 68 हजार मतदार असून त्यापैकी कितीजण आपल्या मतदानाचा हक्क बजावतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.