पुणे, 16 डिसेंबर : पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माथाडी शहर उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवर घातला. पण, पोलिसांच्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनीच पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.
भारतीय जनता पक्षाचे माथाडी शहर उपाध्यक्ष अक्षय वरघडे यांचा होता. त्यानिमित्ताने गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीचे बिबवेवाडी परिसरातल्या शेतमाळा लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. यावेळी मोठमोठाले स्पीकरर्स लावलेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
(कानडी सरकारच्या ड्रायव्हरचा खोटेपणा उघड, गाडीवर दगडफेकीबद्दल नवा खुलासा)
कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रुमला तक्रार केली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी पोलिसांनी काही तरुणांचे मोबाईल आणि गाड्या जप्त केल्या. पोलिसांच्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवरच उलट मोर्चा काढला.
(नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या शिंदे गट प्रवेशाने संजय राऊत संतप्त; म्हणाले ते दलाल..)
बिबवेवाडी पोलीस स्टेशनवर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी ही बिबवेवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी झोन 5चे पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख थेट बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. व या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी बिबेवाडी पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांना आदेश दिले. या प्रकरणावर आता वाद निवळला आहे. मात्र, झालेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news