महाराष्ट्राच्या मातीची स्वतंत्र ओळख मोजतेय शेवटची घटका, बळीराजाचे 'मार्ट' संकटाच्या खाईत!

महाराष्ट्राच्या मातीची स्वतंत्र ओळख मोजतेय शेवटची घटका, बळीराजाचे 'मार्ट' संकटाच्या खाईत!

एकेकाळी या बाजाराची महाराष्ट्रात स्वतंत्र अशी ओळख होती. मात्र, ती आता बदलत्या काळात पुसली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Share this:

पुणे, 30 जून : खरिपाचा हंगाम सुरू झाला की शेतात  पेरणी करण्यासाठी आजही ग्रामीण भागात बैलांचा वापर केला जातो आणि पेरणी करण्यासाठी बैलजोडी महत्वाची असते. शेतकरी मग बैल खरेदी विक्री साठी आपसुकचं वळतो बैल बाजाराकडे..

जून महिन्यात बळीराजा सर्वदूर चांगला बरसला आहे. यामुळे पुर्व मशागतीच्या कामासाठी व पेरणीसाठी बैलखरेदी-विक्री साठी बैलबाजारात मोठी गर्दी करू लागला आहे. काही ठिकाणी  पावसाने हुलकावणी दिल्याने बैलबाजारात  बैलांची आवक वाढून सुद्धा भाव मात्र स्थिर आहेत. पुणे जिल्ह्यातील बेल्हा बैलबाजार हा पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेला  सर्वात मोठा बैलबाजर आहे.  प्रत्येक सोमवारी या बैलबाजारात बैल खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी होते. गावठी, खिलार, भडुशी आणि जर्शी जातीचे  बैल या ठिकाणी विक्रीसाठी येतात. सुमारे 40 ते 80 हजारापर्यंचा भाव बैलजोडीला मिळतो.

बैलांचा कलर,शिंगे,वशिंग,दात आणि बैलांची उंची यावर हे दर ठरतात. पण कोरोना परिस्थितीमुळे हा बैल बाजार मागील 3 महिन्यापासून बंद होता. मागील 2 आठवड्या पासून तो सुरू झाला. मात्र, बाजारावर कोरोनाचं संकट कायम आहे. कारण, व्यवहार मंदावले आहेत आणि उलाढाल सुद्धा कमी झाली आहे.

   एकेकाळी या बाजाराची महाराष्ट्रात स्वतंत्र अशी ओळख होती. मात्र, ती आता बदलत्या काळात पुसली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील एक नावाजलेला आठवडे बाजार,  बैल बाजार असलेले बेल्हे गाव पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. साधारणपणे 1930 च्या दशकात बेल्हे ग्रामपंचायत आणि बाजाराची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार हा जुन्या आळकुटी रस्त्यावरील टका वस्ती या भागात भरत होता. त्या वेळेचे त्याचे स्वरूप म्हणजे भाजीपाला किराणा सामान, कडधान्य, बाजरी, ज्वारी, गहू, असा सर्व गावरान सकस व रासायनिक खतापासून मुक्त अशा प्रकारची धान्ये मुबलक प्रमाणात मिळत असत.

त्या वेळी बाजारात खरेदी विक्री करत असताना वस्तू विनिमय जास्त चालत असे. त्या वेळचे चलन म्हणजे, भोकपड्या पैसा, घोडा छाप पैसा, तांब्याचे चलन, कथलाचे दोन पैसे, एक आणा, पितळी दोन आणे, चांदीचे चार आणे, आठ आणे, राणी किंवा राजा छाप चांदीचा रुपया अशा प्रकारचे चलन वापरात असे. त्या वेळी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांची संख्या ही शंभर ते दीडशेच्या घरात असायची.  सोळा आण्याच्या रुपया मानला जात असे त्या सोळा आण्याला मनभर म्हणजे चाळीस किलो धान्य मिळत असे.

मुंबईत विनाकारण येणाऱ्यांची आज झाली दैना, या भागात सुरू आहे नाकाबंदी

सोळा आण्याला चाळीस अंडी व दीड ते दोन रुपयाला गावरान कोंबडी मिळायची. दोन पैश्यांची केळी संपूर्ण घराला पुरत असत. बाजारात होणारी ये-जा ही पायीच असे. माल वाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडी वापरली जात असे. बाजारात येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पानकोळी समाजाकडून पखाली मार्फत केली जायची. त्या नंतर बाजारातील वर्दळ वाढू लागल्याने व टका येथील जागा कमी पडू लागल्याने 1940  नंतर बाजार हा बेल्हे गावात त्या वेळेचे नबाब ह्यांच्या गढीजवळ व मारुती मंदिराच्या आसपास भरू लागला. परंतु, येथेही जागा कमी पडू लागल्याने 1945 नंतर बेल्हे बाजारचे स्थलांतर आजच्या ठिकाणी म्हणजे गावातून जाणाऱ्या कल्याण – अहमदनगर महामार्गावर लागत असणाऱ्या मोकळ्या 6-7 एकर क्षेत्रावर भरपूर झाडे असणऱ्या ठिकाणी झाले.

वेळी बाजारावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असायचे. त्या मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात विकास कामांना चालना मिळायची. त्यावेळेपासून सर्व शेतकरी व व्यापारी यांची जागा ठरलेली असायची. त्यात कापड दुकानदार, जुन्या कपड्याचा बाजार, अंडी व कोंबडी बाजार,सुकी मासळी बाजार, मसाले, किराणा समान, धान्याचा भुसार बाजार, चप्पलांचा व चामड्यांचा वस्तू ह्या एका बाजूला असायच्या व भाजीपाला आणि फळ फळावळ इतर गरजेच्या वस्तू या एका बाजूला असायच्या आजही परंपरे नुसार तसेच दृश्य दिसते.

या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे बैल बाजार हा बाजार एका बाजूला 4-5 एकरात भरत असायचा. ह्या बाजारात जवळपासच्या गावातील बैल व इतर जनावरे विक्रीसाठी यायची. तसेच प्रामुख्याने पंढरपुरी (खिलारी), गावठी, भडोशी या जातीचे बैल पंढरपूर, सातारा सांगली, इस्लामपूर, मंगळवेढे, कर्नाटकातील बेळगाव व ईंडी या ठिकाणाहून जातिवंत बैल विक्रीसाठी येत असत. या बैलांसाठीचे खरेदीदार हे परजिल्ह्यातून म्हणजे लासलगाव नाशिक, लोणी प्रवरा, जामखेड, टोकावडे, म्हसे, मुरबाड, सरळगाव, यासह इतरही ठिकाणाहून येत असत. पूर्वी आजच्या सारखी वाहतुकीची सोय नसल्याकारणाने जनावरांची वाहतूक ही पायीच केली जायची.

कोरोनाच्या वेगाला छोटा ब्रेक, वाचा 24 तासातली नवीन आकडेवारी

1940 च्या दरम्यान हा बाजार शनिवार पासूनच सुरू होऊन तो मंगळवार दुपारपर्यंत चालू असायचा. येणाऱ्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जेवनाची व्यवस्था अतिशय अल्पदरात सोनाबाई शिंदे, सावित्राबाई बनकर, महादू संभेराव, बबनराव जगताप, रंगनाथ पोपळघट, कासाबाई बांगर यांच्या जेवणाच्या खानावळी होत्या. त्यात प्रामुख्याने मटकी उसळ, भाजी, पुरी, असा जेवणाचा बेत असायचा. हे जेवण फक्त काही आण्यात, व चहा दोन पैश्यात मिळत असे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भोवतालच्या तीन विहिरीमधून करण्यात यायची. विहिरीतून पाणी बादलीने ओढून व हंड्याने डोक्यावर घेऊन एक पैशाला तांब्या व एक आण्याला एक हंडा विक्री होत असे. तसेच जनावरांच्या पिण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन पैशांना हंडा या प्रमाणे विक्री होत असे. तरी देखील एक महिला दिवसभरात साधारणपणे दहा ते बारा रुपयांची कमाई पाणी विक्री करून करत असे.

सर्व साधारणपणे 1950 च्या दशकात चांगल्या जातिवंत बैलांची किंमत चारशे ते पाचशे रुपयापर्यंत असायाची. या किंमतीची बैलगाडा शर्यतीसाठी वापरली जायची. शेतीसाठी वापरण्यात येणारा बैल हा 150 ते 250 रुपयांपर्यंत मिळायचा. या बाजारचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पूर्वीपासून आजपर्यंत गावठी गायीची खरेदी विक्री होत नाही. त्या काळात विहिरीतून पाणी काढण्याच्या मोटा पाच पावली (लहान) सहा पावली (मोठी) ह्यांच्या किंमती पस्तीस चाळीस रुपयांपर्यंत असायच्या. जुन्या मोटा परत केल्यावर वाहनांच्या (चप्पल) दोन जोडी तयार करून मिळायच्या. १९८४ च्या सुमारास बेल्हे ग्रामपंचायतीकडून बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कडे हस्तांतरित झाला व बाजारच्या आधुनिकीकरनाचे काम सुरू झाले.

भाजीपाला व इतर व्यापाऱ्यांसाठी ओटे बांधण्यात आले. प्रत्येक व्यापाऱ्याला परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली. जागा भाडे सक्तीचे झाले. जनावरांच्या खरेदी विक्रीवर कर लावण्यात आले. बाजारसाठी येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश कर सुरु करण्यात आला. पूर्वी वाहतुकीची साधने गतिमान नसल्यामुळे बाजार तीन दिवस चालायचा तो आता एक दिवसापर्यंत मर्यादित झाला. त्यामुळे बेल्हे गावातील लहान मोठे दुकानदार व बेरोजगार यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. तसेच दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे गाडा शर्यतीसाठीचा चारशे ते पाचशे रुपयांचा बैल दोन लाखांपर्यंत मिळू लागले. मात्र, बैलगाडा शर्यती बंद झाल्या नंतर शर्यतीच्या बैलांची किंमत पुन्हा कमी झाली. शेतीसाठीचा बैल आज 40 ते 80 हजारपर्यंत मिळतोय.

जळगावातील पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेडला हलवणार; आमदारांनी केला विरोध

सर्व साधारण पणे दोन ते पाच एकर शेती असणारा शेतकरी आज बैल खरेदी करून त्याचे पालन पोषणही करू शकत नाही. आजच्या बाजारात साधा चहा दहा रुपये व भाकरीही दहा रुपये झाली. पूर्वी बाजारात येणारी लोकर,कडबा अंबाडी, डोंगरी गवत हे सर्व बंद झाले. पूर्वी बाजारचे बरेचसे व्यवहार विश्वासावर चालायचे ते आता राहिले नाही. आता बाजारसाठी (व्यापारासाठी) आणलेले चलन जपत बाजारचे व्यवहार करावे लागतात. अन्यथा एखादा भुरटा चोर हात साफ करून जात असे.

पूर्वी, पाच रुपयांचा बाजार किमान एक महिन्याचा तरी होत असे. परंतु, आता पाचशे रुपयांत आठवड्याचा सुद्धा भाजीपाला येत नाही. शेवटी काळाचा महिमा. यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आणि  आता बैलांची खरेदी विक्री सुद्धा घटली. पुढे जाऊन बेल्ह्याचा बैलबाजारात ही ओळख  पुसली गेली तर आश्चर्य वाटू नये इतकंच!

संपादन -सचिन साळवे

First published: June 30, 2020, 11:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading