पुणे, 12 फेब्रुवारी : महावितरणकडून सध्या कृषीपंपाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज तोडणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. ऐन रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्याची वेळ आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानं हातात आलेला घसा हिरावला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून, राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच शद्बाची आठवण करून दिली आहे. नेमकं काय म्हणाले भरणे? महावितरणकडून सध्या कृषी पंपाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज तोडणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावरून दत्तात्रय भरणे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकारने शेतकऱ्याची संपूर्ण विज बिल माफी केली आहे, महाविकास आघाडीने देखील त्या पद्धतीने वीजबिल माफी करावी अशी मागणी विधानसभेच्या सभागृहात केली होती. आता तुमचे सरकार आहे, शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्याला कोंडीत पकडण्यापेक्षा तुम्ही तुमचा शब्द पाळा आणि शेतकऱ्याची वीजबिल माफी करा’ अशी मागणीचं आमदार भरणे यांनी केली आहे. हेही वाचा : प्रणिती शिंदे, रोहित पवार वाद पेटला; ..तर तुमची जागा धोक्यात येऊ शकते, राष्ट्रवादीचा थेट इशारा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे पाणी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू हरभारा यासह बागायती पिकांची लागवड केली आहे. मात्र ऐन पिकाला पाणी देण्याच्या हंगामात महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्यानं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाहीये. पाण्याभावी पिके वाळून चालली असून, हाताशी आलेला घास हिरवला जातो की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.