चिंचवड, 06 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णयक आणि महत्त्वाचा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. पण अजूनही महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार गॅसवर आहे. अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आले नाही.
भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. पण, महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर झाले नाही.
भाजपने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. मोरया गोसावीचं दर्शन घेऊन नेत्यांची भेट घेत अश्विनी जगताप यांची प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
(आधी कुलकर्णी, आता टिळक पुढचा नंबर...,भाजपच्या खेळीमुळे ब्राम्हण समाज नाराज, कसब्यात बॅनरबाजी)
तर, महविकास आघाडीतील चिंचवड विधानसभा कोण लढवणार यावर अजून एकमत झाले नाही. ठाकरे गटाचे राहुल कळाटे आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये शुकशुकाट आहे.
('टिळकांवर अन्याय, ब्राह्मण नाराज', हिंदू महासंघ कसबा लढण्याच्या तयारीत, भाजपचं टेन्शन वाढणार?)
दरम्यान, मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज थेट टिळक वाड्यावर पोहोचले आहेत. त्यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते रोहित टिळक हे देखील आहेत. यावेळी बोलताना रोहित टिळक यांनी म्हटलं की, भाजप टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटत होतं, म्हणूनच मला पक्षाने विचारणा करूनही शांत राहिलो. पण भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारलं, याचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये, या नाराजीचा त्यांना फटका बसेल, मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रवी धंगेकर यांच्या पाठिशी असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: पिंपरी-चिंचवड, पुणे