पुणे, 20 जून: तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकतात, हे बारामती शहरातील एका मटका व्यावसायिकाच्या मुलानं करून दाखवलं आहे. एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून हा मुलगा थेट नायब तहसिलदार बनला आहे. विक्रांत कृष्णा जाधव असं या तरुणानं नाव आहे. विक्रांत यानं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. परंतु त्याचं हे यश बघण्यासाठी त्याचे वडील हयात नाही. महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विक्रांत जाधव यानं यश संपादन करत नायब तहसिलदार पदाला गवसणी घातली आहे. विक्रांत सध्या सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. विक्रांतचे वडील कृष्णा जाधव यांचा बारामती शहरात मटका व्यवसाय होता. मात्र, त्यांची दोन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. विक्रांत यानं चांगला अभ्यास करून मोठा अधिकारी व्हावं, नाव कमवावं असं कृष्णा जाधव यांचं स्वप्न होतं. विशेष म्हणजे, कृष्णा जाधव यांनी मटका व्यवसायाचा आपल्या कुटुंबावर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनी मुलाला योग्य संस्कार दिले. त्याची पावती आज विक्रांतने दिली आहे. मात्र, आपल्या मुलाचं यश पाहण्यासाठी ते या जगात नाहीत, हे सांगताना विक्रांतचे डोळे पाण्यानं भरून आले होते. विक्रांत यानं सांगितलं की, त्याला वकील व्हायचं होतं. मात्र, वडिलांच्या इच्छेनुसार त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आलं. मात्र, त्यामुळे तो खचला नाही. तो जिद्दीनं पुन्हा अभ्यासाला लागला. दररोज 10-12 तास अभ्यास करून यश मिळवलं आहे. भविष्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पदी विराजमान होण्याचा मानस विक्रांत याने बोलून दाखवला आहे. अन्य बातम्या जिद्दीला सॅल्युट! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा Zoom App वापरत असाल तर सावध राहा, पोलिसांनी दिला इशारा; या 6 गोष्टी लक्षात ठेवा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.