रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 4 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी काल सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते. स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. मात्र यात स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे मात्र दिसत नव्हते. यानंतर पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली. मात्र, यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट म्हणजे रोहित पवारांना चिमटा आहे का, अशी चर्चा होत आहे. काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे - आत्मक्लेशपेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचे महत्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य! असल्याचे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी सोशल मिडियावर पोस्ट करत आमदार रोहित पवारांना घरचा आहेर देत चिमटा काढला आहे. काल वढू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही, असा खुलासाही खासदार अमोल कोल्हेंनी केला.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या “शिवपुत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहितीही त्यांनी दिली. हेही वाचा - अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? रोहित पवारांच्या कार्यक्रमाला मारली दांडी तर मतदारसंघातील “आत्मक्लेश”साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही. कारण शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्व दिलं असतं. त्याच आदर्शावर चालण्याचा माझा प्रयत्न असल्याचे कोल्हे सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
मागील काही दिवसांपासून शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थित असतात. त्यात कालही ते त्यांच्याच शिरुर लोकसभा मतदारसंघात असलेल्या वढू बुद्रुक येथील रोहित पवारांच्या आत्मक्लेश कार्यक्रमासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.