पुणे, 7 मे: दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त असलेल्या एका साडेआठ महिन्याच्या बालकात आईनं दुसऱ्यांदा प्राण फुंकला आहे. आपल्या पोटच्या मुलाला यकृतसंबंधित दुर्मिळ आजारानं ग्रासलं असल्याचं कळताच जन्मदातीनं आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर साडेआठ महिन्याच्या बाळाचा जीव वाचला आहे. या मातेनं आपलं यकृत दान करून बाळाला दुसऱ्यांदा जन्म दिला आहे. या बाळावर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून बाळाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी साडेआठ महिन्याच्या या बाळाला कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात आणलं होतं. दरम्यान वैद्यकीय चाचण्यांमध्ये बाळाला एका दुर्मिळ आजारानं ग्रासल्याचं समोर आलं. बाळाला यकृत संबंधित अलजाईल सिंड्रोम नावाचा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. अलजाईल सिंड्रोम हा दर्मिळ जनुकीय आजार असून हा आजार यकृत, हृदय, आणि मृत्रपिंडावर परिणाम करतो. त्यामुळे एकीकडे बाळाचा कावीळ वाढत असताना यकृताची परिस्थितीही बिघडत होती. त्यामुळं बाळाचं वजन झपाट्यानं कमी होत होतं. बाळाची ही अवस्था पाहून आईनं यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. आईनंच यकृत दान केल्यामुळे लवकरात लवकर शस्त्रक्रिया होऊ शकली. आईच्या यकृताचा काही भाग बाळाच्या यकृताला जोडण्यात आला आहे. हे ही वाचा- पतीला वाचवण्यासाठी त्या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पण कोरोनानं हिरावलं सौभाग्य ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून आता बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान बाळाची शरीरात अनेक गुंतागुंतीची समस्या तयार झाली होती. शिवाय वजन कमी झाल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. पण बाळाने उपचाराला योग्य प्रतिसाद दिल्यामुळे त्याला 20 दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.