पुणे, 15 सप्टेंबर: पुण्यात महिलांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीनं हिसकावून (Mobile snatching in pune) नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि सर्व्हेलन्स पथकाकडून अनेक ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान गस्त घालत असताना विमानतळ पोलिसांनी मोबाइल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक (4 Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. नेमकं काय घडलं? फिर्यादी महिला पुण्यातील विमानतळ परिसरात एका रस्त्याच्या बाजूला उभी होती. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या हातातील मोबाइल फोन हिसकावून नेला आहे. भामट्यांनी अचानक येऊन मोबाइल हिसकावल्यानं फिर्यादी महिला काहीही करू शकली नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral Video) होतं आहे. विशेष म्हणजे विमानतळ पोलीस याच हद्दीत गस्त घालत होते.
हेही वाचा- लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; ‘ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है’ म्हणत.. विमाननगर परिसरातील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नंबर प्लेट नसलेल्या दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाइल फोन जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याकडील दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हेही वाचा- पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार मनोज काशिनाथ कासले (वय-20), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-20), बालाजी धनराज कासले (वय-22), शेरली चांदसाहेब शेख (वय-22) असं अटक केलेल्या भामट्यांची नावं असून सर्वजण कर्नाटकातील रहिवासी आहेत. पण सर्व आरोपी सध्या पुण्यातील औंध परिसरातील कस्तुरबा वसाहतीत वास्तव्याला आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी कुठे कुठे गुन्हे केले याचा तपास केला जात आहे.