पुणे, 19 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात (Pune market yard news) किरकोळ फळभाजी विक्रीला अखेर बंदी घालण्यात आली आहे. तसंच आडते आणि खरेदीदारांना पासशिवाय मार्केटयार्डात यापुढे प्रवेश मिळणार नाही. गेल्या शुक्रवारीच 'न्यूज 18 लोकमत'ने मार्केट यार्डात किरकोळ विक्रीमुळे गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलं होतं. काही लोक तर किरकोळ भाजी, आणि फळांच्या खरेदीसाठीही मार्केट यार्डात गर्दी करायचे. त्यामुळे मार्केट परिसरात डमी विक्रेत्यांकडून कुठल्याही परवानगीविना गाळ्यासमोरच स्त्यावरच किरकोळ विक्री केली जात असे.
या सगळ्या प्रकारामुळे रोज सकाळी गुलटेकडी मार्केट यार्डात प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्ण फज्जा उडायचा. परिणामी मार्केटयार्ड कोरोना फैलावाच्या दृष्टीने सुपर स्प्रेडर सेंटर बनून गेलं होतं. पण मार्केट यार्डचे प्रशासक मधुकर गरड यांच्याकडून याबाबत कुठलीच कार्यवाही होत नव्हती. अखेर 'न्यूज 18 लोकमत'ने मार्केट यार्डमधील भयावह गर्दीचं चित्र समोर आणताच पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालं आणि याबाबत तातडीची बैठक बोलावली गेली. त्यात मार्केटयार्ड आवारात रोज सकाळी होणाऱ्या गर्दीवर कठोर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला गेला. त्यातूनच मग किरकोळ विक्रेत्यांवर निर्बंध घातले गेले आहेत.
हेही वाचा - 'बेड न मिळाल्याने माझ्या पत्नीने आत्महत्या केली', पतीच्या दाव्याने पुण्यात खळबळ
पुण्यात बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी कोणते निर्णय घेतले?
- प्रत्येक आडत्याला फक्त चार पास
- मार्केट यार्डात रिक्षा संपूर्ण बंद
- गेट नंबर 7 फक्त व्यावसायिक वाहेन उभी राहतील
- डमी विक्रेते आणि किरकोळ लिंबू विक्री बंद
- ओळखपत्राशिवाय बाजारात प्रवेश नाही
- 30 पोलीस आणि बाजार समिती कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी
- नियम मोडले तर गुन्हे दाखल करणार
- भुसार बाजारातील सर्व मालाच्या गाड्या 12 नंतर खाली होणार
- वाहनतळावर पास किंवा ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही. अन्यथा संबधित ठेकेदारावर कारवाई
- 30 तारखे पर्यंत बाजार समिती, वाहतूक पोलीस, पोलीस यांच्या समन्वयाने बाजार सुरू राहणार
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. बेड, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन यांसारख्या आरोग्य सुविधा मिळवताना रुग्णांच्या नाकीनऊ येत आहे. मात्र अशा स्थितीतही काही नागरिक विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे आगामी काळात शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारी ओळखून शिस्त पाळणं गरजेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Pandemic, Pune, Pune (City/Town/Village), Rising cases