पिंपरी निगडी, 23 जुलै: पिंपरीतील एका नामांकित हॉस्पिटलला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने 25 लाखांची खंडणी मागणाऱ्याला निगडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केला आहे. रात्रभर त्याच्यावर पाळत ठेऊन भल्या पहाटे आरोपीला पुण्यातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सौरभ संतोष अष्ठूळ (वय- 21, रा. लोहियानगर, गल्ली नं.1, गंजपेठ, पुणे- 42) असं आरोपीचं नाव आहे. पोलिस चौकशीत आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध भादंवि कलम 387, 501, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा… ‘इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य’ काय आहे प्रकरण? निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण गंगाधर जोशी यांना मोबाइलवर अज्ञात व्यक्तीनं फोन करून मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऑफिसमधून त्यांचा पी.ए. सावंत बोलतो. कोरोनाच्या महामारीमुळे गरीबांची अवस्था बिकट आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब 25 लाख रुपयांची रक्कम आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाही तर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याने डॉ. जोशी यांना संशय आला. त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे शहानिशा केली असता असा काही एक प्रकार नसल्याची माहिती डॉ.जोशी यांना मिळाली. त्यांनी निगडी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. हेही वाचा… ‘मराठा आरक्षण मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्यांना…’, भाजपचा शिवसेनेवर पलटवार पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. पुणे शहरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, सिमकार्ड, एक मोटार सायकल असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.