वपुणे, ०३ जून : पुणे (Pune) शहरातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत उघडण्यास परवानगी दिली खरी पण पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते अजूनही तसेच अर्धवट अवस्थेत असल्याने पुणेकरांंना त्याचा प्रचंड मनस्ताप होतोय. विशेषत: शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांची अवस्था तर या खोदकामामुळे प्रचंड वाईट बनली असून सगळीकडे ट्रॅफिक जामचं चित्र बघायला मिळत आहे.
लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक, शनिवार पेठ, सदाशिव पेठ अशा सगळ्याच भागात पाईपलाईन टाकण्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे दुकानदारांसोबतच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा मनस्ताप होतोय. लक्ष्मी रोडवर तर प्रचंड धुळीचं साम्राज्य पसरल्याने पथारीवाल्यांनी विक्रीस ठेवलेले नवे कपडे धुळीने माखून जात आहेत. त्यामुळे आम्ही धंदा करायचा तरी कसा? असा उद्विग्न सवाल पथारीवाले करत आहेत.
Maharashtra Unlock: अनलॉक झालेल्या 18 जिल्ह्यांची यादी, वाचा सविस्तर
पुणे शहरात गेले दोन महिने कोरोना लॉकडाऊन लागलं होतं म्हणून मग रस्ते मोकळे आहेत तर पाण्याची जुनी पाईपलाईन बदलून टाकुया, या उद्देशाने पालिकेनं मध्यवर्ती पेठांमधील सर्व रस्ते खोदून पाण्याची नवी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं. पण कंत्राटदारांनी लॉकडाऊन संपलं तरी हे काम पूर्ण केलंच नाही. परिणामी आता लॉकडाऊन उठताच रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली. अशातच पालिकेनं सर्व दुकानं सकाळी 7 ते दुपारी २ या एकाच वेळेत उघडण्याची परवानगी दिली आणि पहिल्या दोनच दिवसात सोशल डिस्टंटचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र बघायला मिळतंय. म्हणूनच लक्ष्मी रोडवर तर दुकानदारांना त्यांची वाहनं पार्किंग करायलाही जागा नाहीये कारण कंत्राटदाराने रस्ते खोदाईचं काम अनेक ठिकाणी अर्धवट ठेवलंय.
स्पिनर्सचा दर्जा पाहून भारतीय खेळाडू दु:खी, म्हणाला भयानक आहेत बॉलर्स
म्हणून हे अर्धवट तात्काळ पूर्ण करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी पालिकेकडे केली आहे. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कंत्राटदारांना हे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिलेत खरे पण दोनपर्यंत ट्रॅफिक जाम असल्याने त्यांनाही दुपारी तीन नंतरच काम करता येतंय पण मुळात मुद्दा असा आहे की, संबंधित कंत्राटदारांनी ही कामं लॉकडाऊन काळात का पू्र्ण केली नाहीत? आणि या दिरंगाईबद्दल संबंधित अधिकारी आणि कंञाटदारांवर कारवाई होणार आहे की नाही? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.
पालिकेच्या या नियोजन शुन्य कारभाराचा फटका फक्त मध्यवर्ती पेठांनाच बसलेला नाही तर सहकारनगरमध्येही कंञाटदारांनी रस्ते खोदून ठेवल्याने ट्रँफिक पोलिसांना चक्क डेब्रिजच्या ढिगाऱ्यावर उभारून वाहतूक नियमन करावं लागतंय. थोडक्यात लॉकडाऊनला कंटाळून बाहेर पडणाऱ्या पुणेकरांची अवस्था ट्रॅफिक जाममुळे पुरती दयनीय बनली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.