मुंबई, 3 जून : भारत म्हणजे एकेकाळचं स्पिन बॉलिंगचं (Spin Bowling) माहेरघर. भारताने जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज स्पिनर दिले, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भारताचा माजी स्पिनर मुरली कार्तिक (Murali Karthik) याने भारतातल्या स्पिनर्सचा दर्जा पाहून दु:ख व्यक्त केलं आहे. भारतीय स्पिनर्सच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे, असं मुरली कार्तिक म्हणाला आहे. स्पिन भारतीय टीमची ताकद होती, तेव्हा मी खेळलो याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. बिशन सिंग बेदी यांनी मला स्पिन बॉलिंगमधल्या अनेक गोष्टी शिकवल्या, तसंच वनडेमध्येही स्लिप आणि सिली पॉईंट लावून आक्रमण करायला सांगितलं, अशी प्रतिक्रिया कार्तिकने दिली. मुरली कार्तिक 2000 च्या दशकात भारतीय टीममध्ये होता, तेव्हा महान स्पिनर अनिल कुंबळे आणि हरभजनही होते. ‘काही स्पिनर सोडले तर स्थानिक क्रिकेटमध्ये लाल बॉलने क्रिकेट खेळून नाव कमावणारे स्पिनर्स नाहीत. त्यामुळे स्पिनरनी मर्यादित ओव्हरमध्ये नाव कमावण्याऐवजी लाल बॉलने क्रिकेट खेळण्याला प्राथमिकता द्यावी,’ असा सल्ला कार्तिकने नव्या बॉलर्सना दिला आहे.
मुरली कार्तिक द लास्ट विकेट पॉडकास्ट या कार्यक्रमात बोलत होता. ‘गोष्टी बदलल्या आहेत, त्याचसोबत गुणवत्ताही ढासळली आहे. त्यामुळे आपल्याकडे आता तसे स्पिनर्स नाहीत. स्पिनचा दर्जा खाली जात आहे. आम्ही ज्या स्पिनरना बघून मोठे झालो, ते आता वरून काय भयानक बॉलर आहे, असं म्हणतील,’ अशी प्रतिक्रिया कार्तिकने दिली. मुरली कार्तिकने भारताकडून 8 टेस्ट मॅचमध्ये 2.54 च्या इकोनॉमी रेटने 24 विकेट घेतल्या. तर 37 वनडेमध्ये त्याला 5.07 च्या इकोनॉमी रेटने 37 विकेट घेतल्या. कार्तिकला फक्त एक टी-20 मॅच खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. निवृत्त होण्याआधी कार्तिक आयपीएलमध्येही खेळला. आता तो कॉमेंट्री करत आहे.

)







