भदेरवा (जम्मू-काश्मीर), 23 एप्रिल : काश्मीर खोऱ्यातल्या दोडा जिल्ह्यातलं एक सुंदर गाव भदेरवा. पुण्याच्या एका फिल्म मेकरची टीम या गावात एका सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी मार्च महिन्यात पोहोचली , त्या वेळी Coronavirus चं थैमान इतक्या वेगात येऊन धडकेल याची कुणालाच कल्पना नव्हती. 24 मार्चपर्यंत काश्मीरमधलं काम आटोपून 25 मार्चच्या फ्लाइटने पुण्यात पोहोचायचा या कलाकारांचा बेत होता. पण त्याअगोदर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासूनच देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला आणि ही पुणेकर मंडळी काश्मीरमध्येच अडकली. आता एक काश्मिरी मुस्लीम कुटुंब या पुणेकरांची आत्मीयतेनं काळजी घेत आहे. दोडा जिल्ह्यातल्या गाठा गावातल्या या काश्मिरी घरातच नचिकेत आणि टीम गेला जवळपास महिनाभर राहात असून लॉकडाऊन वाढवल्यावरसुद्धा या घरातल्या नझीम मलिक यांनी तितक्याच प्रेमानं त्यांना संकटकाळ संपेपर्यंत तिथेच राहायला सांगितलं आहे.
लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO
नचिकेत गुट्टीकर, शामीन कुलकर्णी आणि निनाद दातार यांची एक टीम एका माहितीपटाच्या निर्मितीसाठी 15 मार्चला काश्मीरला पोहोचले. काम उरकून 25 मार्चला पुण्याला पोहोचायचा त्यांचा बेत लॉकडाऊनमुळे फसला. सगळ्या देशांतर्गत विमानसेवा, रेल्वेसेवा बंद झाल्या आणि काश्मीरमध्येच थांबण्यावाचून या तरुणांना पर्याय राहिला नाही. तोवर काश्मीरमधली हॉटेल्स, गेस्ट हाऊसही बंद व्हायला लागली होती. आता काय करायचं असा प्रश्न नचिकेत, शामीन आणि निनादला पडला. पण त्याच वेळी नझीम मलिक यांनी आपणहून या तरुणांना आपल्या घरी राहण्याचं सुचवलं. त्यांनी या पुणेकरांना फक्त आपल्या घरात आश्रय दिला असं नाही, तर त्यांचा चांगला पाहुणचारही केला. अजूनही करत आहेत. “आम्हाला इथे खरी काश्मिरियत म्हणजे काय याचा अनुभव मिळतो आहे. पंतप्रधान मोदींनी 24 तारखेला रात्री लॉकडाऊन जाही केला आणि आता काय करायचा असा मोठा प्रश्न पडला. आम्ही तणावाखाली आलो. थोडे घाबरलोही. त्या वेळी मलिक स्वतःहून पुढे आले आणि ते आपल्या घरी आम्हाला घेऊन आले”, नचिकेत सांगतात. “मलिक यांचं कुटुंब आमची इतक्या आपुलकीनं काळजी घेतायत की असा पाहुणचार देशात इतर कुठे मिळेल असं मला वाटत नाही. खरी काश्मिरियत आम्ही अनुभवत आहोत. आम्ही या सगळ्यांचे ऋणी आहोत”, नचिकेत सांगतात. एवढं करूनसुद्धा नझीम मलिक अत्यंत नम्रपणे सांगतात, “आम्ही वेगळं काहीच करत नाही आहोत. आमची मुलं उद्या पुण्यात किंवा अन्यत्र अशी अडकली असती तर… त्यांनाही अशीच मदत मिळेल, मला खात्री आहे. आम्ही काही उपकार करत नाही, तर आमचं कर्तव्य करत आहोत.”
कल्याण-डोंबिवलीमध्ये चिंता वाढली, 48 जणांना कोरोना विषाणूची बाधा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.