मुंबई, 7 फेब्रुवारी : सध्या रेल्वे प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेनची जोरदार चर्चा आहे. राज्यातल्या मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई -नाशिक-शिर्डी या दोन मार्गांवर लवकरच वंदे भारत ट्रेन धावणार आहे. या पार्श्वभूमीवर वंदे भारत ट्रेनच्या तिकिटांचे दर जाहीर करण्यात आले आहेत. वंदे भारत ट्रेन वेगवान असल्याने साहजिकच अन्य ट्रेन्सच्या तुलनेत या ट्रेनचं तिकीट महाग असेल.
तसंच मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या अन्य ट्रेन्सच्या तुलनेत या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटाचे दर जास्त असतील, असं सांगितलं जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन्ही मार्गांवरच्या तिकिटांचे दर नेमके किती असतील ते जाणून घेऊ या. `एबीपी लाइव्ह`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
मुंबईतून 10 फेब्रुवारीला दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईतून दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दोन्ही ट्रेन्स मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणार आहेत. यापैकी एक एक्स्प्रेस मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावरून धावणार आहे, तर दुसरी मुंबई- नाशिक-शिर्डी या मार्गावर धावेल. मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वंदे भारत ही सर्वांत वेगवान ट्रेन असेल. ही ट्रेन मुंबई ते पुणे हे अंतर केवळ तीन तासांत कापणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी शिर्डीला सहा तासांत तर सोलापूरला साड़पाच तासांत पोहोचू शकणार आहेत.
हेही वाचा - जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले....; त्या वक्तव्यावरुन संभाजीराजेंनी दिला थेट इशारा
मुंबई ते नाशिक किती पैसे लागणार -
वंदे भारत ट्रेनमधून मुंबईतून पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चेअर कार अर्थात सीसीसाठी 560 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअर अर्थात ईसीसाठी 1135 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे. नाशिकसाठी सीसीचं भाडं 550 रुपये, तर ईसीसाठी 1150 रुपये असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. साईनगर शिर्डीसाठी सीसीकरिता 800 रुपये, तर ईसीसाठी 1630 रुपये भाडं असू शकतं. सोलापूरसाठी सीसी आणि ईसीसाठी तिकिटाचे दर क्रमशः 965 आणि 1970 रुपये असतील.
मुंबई ते सोलापूर या मार्गावरून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस बोर घाटातून जाण्याची शक्यता आहे. तसंच ती 6 तास 35 मिनिटांत सुमारे 455 किलोमीटर अंतर कापेल असा अंदाज आहे. मुंबई-शिर्डी ट्रेन थळ घाटातून 5 तास 25 मिनिटांत 340 किमी अंतर कापण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Mumbai, Mumbai pune expressway, Pune, Railway tracks, Railways