मुंबई, 7 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आव्हाडांवर वादग्रस्त टीका केली. तर यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनीही आता आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्विट करत छत्रपती संभाजीराजे यांनीही आता आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे. काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड? ‘मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असं तावडेंनी विधानसभेत जाहीर केलं. पण समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना,’ असं आव्हाड म्हणाले होते. हेही वाचा - ‘महाराज नसते तर आव्हाड जितुद्दीन, तर पवार…’, पडळकरांची वादग्रस्त टीका
जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावर भाजप आक्रमक झाली, तसंच भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. या वादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं.