पुणे, 18 जून: राज्याचा नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. हनुमंत नाझीरकर यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्यानं नाझीरकर यांच्यासह पत्नी, दोन मुलांवर पुण्यातील अंलकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हेही वाचा.. अरविंद बनसोड मर्डर केस: प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर सणसणीत आरोप पुण्यातील कोथरुड येथील स्वप्नशिल्प सोसायटीतील सदनिकेत 4 पोलिस अधिकारी आणि एसीबीच्या 8 अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकला. यात नाझीरकर यांचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर हनुमंत नाझीरकर यांच्यासह संगिता हनुमंत नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर, भास्कर हनुमंत नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हनुमंत नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीला आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी तसेच इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मालमत्तेची तपासणी सुरु आहे. मागील 6 ते 7 महिन्यांपासून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु होती. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे अंदाजे 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. त्याचे स्पष्टीकरण ते देऊ न शकल्याने शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्ट्राचारातून कमाविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा… पुणे-नगर-पुणे प्रवास भोवला! शासनादेश डावलणाऱ्या अधिकारी महिलेला हायवेवर घेतलं ताब्यात नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगर रचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम पहात होते. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली. सध्या त्यांच्या घरात पोलिसांकडून तपासणी केली जात आहे़ त्यातून अन्य मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.