पुणे, 27 एप्रिल: मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करूनही पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिकेने सुचवला आहे. त्यात लॉकडाऊनबाबत पोलिसांनी पुणेकरांसाठी नवा आदेश जारी केला आहे. पुणे पोलिसांचे लॉकडाऊन संबंधीचे नवे आदेश सोमवारी जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकानं आता 2 तासांऐवजी 4 तास खुली राहणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत लोक भाजीपाला, दूध, किराणा मालासाठी घराशेजारच्या दुकानात जाऊ शकतात. असं पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी नव्या आदेशात म्हटलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीनुसार दुकानांची वेळ वाढवून दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे. हेही वाचा.. पुण्यात आठवड्याभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ, 1300 वर गेला आकडा काय आहे महापालिकेचा अॅक्शन प्लान.. अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित करण्याची महापालिकेची योजना असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरं यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टा भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा हॉटस्पॉट्समधून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे.तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात 20 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची तयारी महापालिका करत आहे. त्यासाठी पोलीस आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यावर जबाबदारी देणअयात येईल. पुणे पोलिसांनीच तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव दिला आहे, असं समजतं. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होईना, म्हणून स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यामधील रुग्णांमध्ये मुंबईच्या तुलनेत कमी वाढ होत असली तरीही लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुण्यात सध्या होणारी वाढही चिंतेचा विषय आहे. पुण्याच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता कितीतरी अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. हेही वाचा.. उद्धव ठाकरेंबाबत शिफारस राज्यपालांना पाळणं बंधनकारक, काय म्हणाले घटना तज्ज्ञ केंद्रीय पथकानं व्यक्त केली चिंता… लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्त केली होती. 7 दिवसांत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ होत असून 9 पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित 1457 रुग्ण पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1457 झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1319 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.