पुणे, 18 जून: राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुण्यात कोरोनाचा धोका कायम आहे. पुणे शहरात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजार पार गेला आहे. पुण्यात वडारवाडी-पांडवनगर, जनवाडी-गोखलेनगर हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर येताना दिसत आहेत. आठवडाभरात या भागात तब्बल 360 च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक वार्ड ऑफिसर आणि पोलिसांनी या भागात तीन दिवसांची जनता संचारबंदी लागू केली आहे. हेही वाचा… पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश दुसरीकडे, पुणे महापालिकेने कोरोना कंटेंटमेंट झोनची फेररचना जाहीर केली आहे. शहरात 5 हजार दुकाने खुली झाली आहेत. गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुण्यात आता 73 कंटेंटमेंट झोन जाहीर असतील. शहरात यापूर्वी 66 कंटेंटमेंट झोन होते. पूर्वीच्या 66 पैकी 24 वगळले तर 32 नव्याने वाढले तर 11 कंटेंटमेट झोनची फेररचना केली गेली आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. शहराच्या आता सर्वच भागात हे कोरोनाबाधित झोन असणार आहेत. शिवाजीनगर, एरंडवना, औंध परिसरातही कोरोना प्रतिबंधित झोनची वाढ झाली आहे. हे नवे कोरोनाबाधित मायक्रो झोन्स जाहीर करताना मुख्य रस्त्यावरील व्यापारी संकुलेच वगळून टाकल्याने पेठांमधील दुकाने उघडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अंदाचे 5 हजार दुकाने तब्बल 3 महिन्यांनंतर खुली झालीत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र 73 वर जाऊनही कोरोना प्रतिबंधित क्षेत्रफळ 3 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर घसरले आहे. पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारांवर पोहोचूनही शहराचं 98 टक्के क्षेत्रफळ खुले राहणार आहे. हेही वाचा.. मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट! दरम्यान, अनलॉकनंतर गर्दी वाढल्याने पुण्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात तब्बल 460 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातली एकूण संख्या 10 हजारांवर गेली आहे. तर दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. पुण्यात बुधवारी 12 कोरोनाबाघित रुग्णांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 वर गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







