पुणे, 06 एप्रिल : कोरोनाच्या रुग्णसंख्येचे आकडे दिवसेंदिवस नवे शिखर गाठत असल्याचं पाहायला मिळतंय. देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर स्थिती ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत पुणंदेखिल आघाडीवर आहे. रोज समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊस फुल्ल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आयसीयू आणि व्हेंटिलटेर बेडच्या (ICU and ventilator beds) बाबतीत तर पुण्यात संकटाला सुरुवातही झाली आहे. कारण सोमवारी सायंकाळचा विचार करता पुणे मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची स्थिती पाहायला मिळाली.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुगणांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या ही केवळ 489 आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही बेड शिल्लक नसल्याचं समोर आलं. रात्री उशिरानंतर यापैकी काही बेड उपलब्ध झाले. पण आता हे बेड फुल व्हायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.
(हे वाचा - कोरोना बळावतोय; रुग्णालयावरील ताण वाढत असल्याने चिंता वाढली)
आयसीयू बेडचा विचार करता. पुण्यात मनपा आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण 430 आयसीयू बेड आहेत. त्यापैकी सोमवारी रात्री केवळ 2 उपलब्ध होते. त्यामुळं आयसीयू बेडची स्थितीही गंभीर असल्याचं पाहायला मिळालंय. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची पुणे महानगर विभागातील रुग्णालयात मात्र उपलब्धता असल्याचं पाहायला मिळालंय. सोमवारी या रुग्णालयांमध्ये 90 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे
(हे वाचा - पुण्यात 8 नव्हे 6 च्या आत घरात; PMC ची नवी नियमावली जाहीर)
पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खासगी रुग्णालयांमध्येही जवळपास 23 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथकं गरजू रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी काम करतात. पुणे महानगर पालिका आणखी 1000 बेडची व्यवस्था करण्याच्या तयारीत असून त्यापैकी 60 बेड आयसीयू बेड असतील. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे तेव्हा जेवढी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या होती, त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.