पुणे, 6 जानेवारी : कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी टिळक कुटुंबाची इच्छा होती. मात्र पुण्यात टिळक कुटुंबाला डावलून भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे पुण्याचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ब्राह्मण समाजामध्ये देखील रासने यांच्या उमेदवारीने नाराजी असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाना साधला होता. आता नाना पटोले याच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
कसबा मतदारसंघाच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? असं थेट आव्हानाच चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना केलं आहे. तसेच चिंचवडमध्ये आम्ही घरातल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, मग तिथे तुम्ही उमेदवार का दिला असा सवाल पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा : कसबा पोटनिवडणुकीत फिल्मी ड्रामा, मविआचा उमेदवार थेट पोहोचला टिळक वाड्यावर
मविआचा उमेदवार टिळक वाड्यावर
दरम्यान आज मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. तसेच त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला अभिवादन देखील केलं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते रोहित टिळक देखील होते. भाजप मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटलं होतं. त्यामुळे पक्षाने मला तिकिटाबाबत विचारणा करूनही मी गप्प बसलो. मात्र त्यांनी रासने यांना तिकीट दिलं. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल असं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Congress, Pune