पुणे, 6 जानेवारी, चंद्रकांत फुंदे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी टिळक कुटुंब इच्छूक होते. मात्र भाजपने तिकीट टिळक वाड्यात न देता हेमंत रासने यांना दिलं आहे. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक वाड्याला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक यांचीही उपस्थिती होती. काँग्रेसच्या या नव्या खेळीने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
'नाराजीचा भाजपला फटका बसणार'
मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज थेट टिळक वाड्यावर पोहोचले आहेत. त्यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते रोहित टिळक हे देखील आहेत. यावेळी बोलताना रोहित टिळक यांनी म्हटलं की, भाजप टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटत होतं, म्हणूनच मला पक्षाने विचारणा करूनही शांत राहिलो. पण भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारलं, याचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये, या नाराजीचा त्यांना फटका बसेल, मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रवी धंगेकर यांच्या पाठिशी असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.
टिळक कुटुंब नाराज
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंब इच्छूक होतं. मात्र भाजपकडून टिळक वाड्यात तिकीट देण्याऐवजी हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune