पुणे, 12 ऑक्टोबर: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सॉफ्टवेअर अभियंता आपल्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात (Software engineer found dead) आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी मृत अभियंत्याचे दोन मित्र घरातच होते. त्यामुळे ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत गूढ निर्माण झालं आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चहूबाजूंनी पोलीस तपास करत आहेत. गणेश यशवंत तारळेकर असं मृत आढळलेल्या 47 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचं नाव आहे. मृत गणेश तारळेकर हे कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्याला होते. तारळेकर हे विवाहित असून त्यांना 14 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. पण त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते. दरम्यान तीन दिवसांपासून मृत गणेश तारळेकर आणि त्यांचे अन्य दोन मित्र तारळेकर यांच्या घरात पार्टी करत होते. दारू प्यायल्यानंतर तारळेकर यांनी अचानक स्वत: च्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती त्यांच्या दोन मित्रांनी दिली आहे. हेही वाचा- 16 वर्षीय युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी; सुसाइड नोटमधून PM मोदींकडे अखेरची मागणी पण यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यामुळे तारळेकर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. हेही वाचा- सोलापुरात महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात; लेक गायब असल्यानं गूढ वाढलं या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, घरातील चित्र पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली. मृत गणेश तारळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना आढळले आहेत. यानंतर पोलिसांनी तातडीने गणेश यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मित्रांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे. पोलीस संशयितांची कसून चौकशी करत असून या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.