पुणे,19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
सिद्धी कामठे (वय-20) असं मृत तरुणीचं नाव आहे. सिध्दी ही ठाणे (मुंबई) येथील रहिवासी होती. ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर आली होती, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शिवजंयतीच्या उत्सवावर विरजण पडले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळील हडसर किल्ल्यावर आला होता. या गटासोबत सिद्धी ही देखील किल्ल्यावर आली होती. किल्ले हाडसर येथे कुटीची वाट या ठिकाणी सिद्धी कामठे हिचा पाय घसरून ती सुमारे 450 फुट खोल दरीत पडली. ही घटना सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन संघाचे रमेशभाऊ खरमाळे, सागर जाबरे, मंदार सन्नाक आणि स्थानिक पोलिस पाटील आणि गावकऱ्यांच्या मदतीने सिद्धीला खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. नंतर तिला जुन्नर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना माहिती दिली असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्वीट करत केलं शिवाजी महाराजांना अभिवादन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news, Shiv jayanti