नागपूरमध्ये संतापजनक घटना, पोलिसाला मारहाण करून गाडीची काच फोडली

नागपूरमध्ये संतापजनक घटना, पोलिसाला मारहाण करून गाडीची काच फोडली

कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाही मास्क का घातला नाही, अशी विचारणा या पोलिसाने केली.

  • Share this:

नागपूर, 30 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्तृव्य बजावत आहे. पण, तरीही पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना घडतच आहे.  नागपूरमध्ये एका तरुणाने पोलिसावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

लॉकडाउनचे पालन करण्याची समज दिल्याने संतापलेल्या एका तरुणाने चक्क पोलिसावरच हल्ला केला. तसंच हवालदाराला मारहाण करून वाहनाची काच फोडली. जुनी शुक्रवारी परिसरात बुधवारी ही घटना घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी कार्तिक साहू नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

हेही वाचाशीखांनी लाखो लोकांना केली मदत, तर अमेरिकन पोलिसांनी असे मानले आभार

आरोपी कार्तिकने आपल्या घरासमोरील रस्त्यावर कार पार्क केली होती. मात्र, त्यामुळे अन्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस स्टेशनला या संदर्भात सूचनाही दिली होती. बुधवारी कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना या मार्गावरून जात होते. रस्त्यावरील कार पाहून पोलीस थांबले.

पोलीस शिपाई संदीप राऊत यांनी ही कार कुणाची आहे, अशी चौकशी केली. संदीप राऊत यांचा आवाज ऐकून कार्तिक घराबाहेर आला. 'ही कार माझी आहे, तुम्हाला काय करायचे आहे', असे विचारून वाद घालायला सुरुवात केली. त्याने पोलिसाला तेथून निघून जाण्याचीही सूचना केली. लॉकडाउन सुरू असतानाही आणि कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाही मास्क का घातला नाही, अशी विचारणा या पोलिसाने केली.

हेही वाचा - भारतात गरिबांना मदत करण्यासाठी 65 हजार कोटींची गरज- रघुराम राजन

त्यामुळे आरोपी कार्तिकने थेट संदीप राऊत यांच्या अंगावर धावून मारहाण करायला लागला. एवढेच नाही तर, त्याने घरातून काठी आणून पोलिसांच्या वाहनांची काच फोडली. हा सर्व प्रकार पाहून  पोलिसांनी बळाचा वापर करून कार्तिकला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. आरोपी कार्तिकला अटक करून त्याच्या विरोधात पोलिसांना मारहाण करणे, लॉकडाउनचे उल्लंघन करणे आणि महामारी कायद्याच्या उल्लंघनाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 30, 2020, 11:34 AM IST
Tags: police

ताज्या बातम्या