लॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा

लॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै: राज्यावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने सुमारे 10 हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिला आहे. महामंडळानं यासंदर्भात एक पत्रक काढून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आल्याचं म्हटलं आहे. महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

हेही वाचा...ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

एसटी महामंडळानं कुठंही कर्माचारी कपात केली नाही. जे चार हजार कर्मचारी भरती करणार होतो, ती भरती थांबण्यात आली आहे. ही भरती टप्याटप्यात करणार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं आहे.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत. एसटी आधीच पाच हजार कोटी रुपयांनी तोट्यात धावत होती. त्यात आता कोरोनामुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. सरकारकडे 480 कोटी मागितले आहेत. पैसे मिळाल्यास या पुढील पगार होतील, असं देखील अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या 100 दिवसांपासून एसटी सेवा ठप्प आहे. दिवसाला 22 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडात असल्याचंही परब म्हणाले.

2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित....

दरम्यान, एसटी महामंडळानं शुक्रवारी एक पत्रक जारी केलं होतं. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून कर्मचारी सेवा खंडीत करण्याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे.

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा... धुळ्यात घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे. मात्र, सरकारच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळानं सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 18, 2020, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading